Wednesday, July 28, 2010

सचिन, सेहवागने लाज राखली

श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात सेहवाग व सचिनने भारतीय संघाची लाज राखली. सेहवाग 99 धावांवर बाद झाल्यानंतर मास्टर ब्लास्टरने शानदार शतक ठोकत भारताची बाजू भक्कम केली आहे. सचिनच्या शतकाने आता भारताच्या आशा जाग्या झाल्या आहेत.

मास्टर ब्लास्टरने आपल्या कसोटी करियरमधले 48 वे शकत ठोकले आहे. लक्ष्‍मण व सचिनने आज भारताचा डाव सावरला. श्रीलंकेने डाव घोषीत केल्यानंतर सेहवागने आज 101 चेंडूत शानदार 99 धावा केल्या. तो एकदिवसीय सामन्यात खेळत असल्याप्रमाणे फटकेबाजी करत होता. परंतु बेजबदार खेळ केल्याने तो 99 धावांवर बाद झाला. यानंतर आलेला द्रविडही केवळ तीन धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या नजरा सचिनवर खिळल्या होत्या. या शतकानंतर आता सचिनच्या 31 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत.

पाकमधील विमान अपघात हा घातपातच ?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून जवळ असलेल्या मरगल्ला हिल्स भागात एका खाजगी कंपनीच्या विमानाला अपघात झाला. ज्या भागात विमानाला अपघात झाला त्या भागात पाकिस्तान सैन्याचा तळ आहे. या भागात पाक सैन्याने विमानभेदी तोफा तैनात केल्या आहेत. हा भाग साधारण 12 हजार 605 हेक्टर परिसरात व्यापलेला आहे.

मरगल्ला हिल्स हा भाग अत्यंत निसर्गरम्य भाग मानला जातो. या भागातील दामनकोह रिसोर्ट अत्यंत प्रसिद्ध आहे. या भागात उंच टेकड्या असून, ट्रेकिंग, पॅराग्लायडींग करण्‍यासाठी अनेक पर्यटक या भागात येत असतात.

या भागातून एअरब्ल्यू कंपनीचे विमान उडत असताना, काही काळापूर्वी त्याचा संपर्क तुटतो, आणि कालांतराने विमानाला भीषण अपघात झाल्याची बातमी येऊन धडकते. यात काही तरी गोम आहे.

या भागात सातत्याने पाक सैन्याचे प्रशिक्षण सुरु असते. विमानांना या भागावरुन जाण्‍याची परवानगी असली तरी त्यांच्यासाठी निश्‍चित नियम आणि अटी घालण्‍यात आल्या आहेत. असे असतानाही विमान कमी उचंवरुन का उडत होते, हे मोठा प्रश्‍नचिन्ह आहे.

ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या भागात पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, परंतु स्थानिक रहिवाश्यांनी मात्र दुसराच दावा केला आहे.

विमानाचे आकाशातच दोन तुकडे झाल्यानंतर विमान कोसळल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकमध्ये सध्या तालिबानचे प्रस्थ वाढत आहे. लखनो, इस्लामाबाद, कराची या सारख्या शहरात राजरोसपणे दहशतवादी हल्ले होत असताना, अत्यंत सुरक्षित मानल्या जाणार्‍या भागात अशा प्रकारे विमान कोसळणे हा घातपातच असल्याचे बोलले जात आहे.

पाकमध्ये विमान अपघातात शंभरावर प्रवासी ठार

पाकिस्तानच्या राजधानीपासून जवळच असलेल्या मरगल्ला हिल्स भागात आज विमानाला झालेल्या अपघातात 150 जण ठार झाल्याची भीती वर्तवली जात आहे. विमानात 159 प्रवासी व चालकदलाचे सदस्य होते. विमान तुर्कस्तानातून कराची मार्गे इस्लामाबादकडे जात असताना हा अपघात झाला.

अपघातानंतर या भागात बचाव कार्यास सुरुवात करण्‍यात आली असून, पाच जणांना वाचवण्‍यात यश आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. खराब हवामानामुळे विमान या भागातील प्रसिद्ध दामनकोह रिसोर्टजवळ कोसळले.

मरगल्ला हिल्स भागात विमानभेदी तोफा तैनात आहेत. या भागात पाक सैन्याचे तळ असल्याने या अपघाताविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

Tuesday, July 27, 2010

अमेरिकेचा पाकला इशारा, हल्लेखोरांवर कारवाई करा

अमेरिकेने पाकला पुन्हा इशारा दिला आहे. मुंबईवर झालेल्या हल्लेखोरांवर पाकने कारवाई करावी असे अमेरिकेने पाकला पुन्हा एकदा धमकावले आहे. भारताचा विश्वास पुन्हा संपादीत करायचा असेल तर पाकने ही कारवाई करावी असे अमेरिकेने म्हटले आहे.

पेंटॉगॉनकडील गुप्त कागदपत्रं गहाळ झाल्याने अमेरिकेचेही धाबे दणाणले आहेत. पाक तालिबानी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा खुलासा यात करण्‍यात आला असून, अमेरिकी सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका अमेरिकी वर्तमानपत्रांनी केल्याने ओबामा अडचणीत सापडले आहेत.

पुणे कॉंग्रेस हा गुंडांचा पक्ष झालाय- कुंजीर

पुणे कॉंग्रेस अध्यक्षपदावरुन झालेल्या वादानंतर पुणे पक्षात गुंडांचे प्रमाण वाढले असून, पुणे कॉंग्रेस गुंडांचा पक्ष झाल्याचे मत माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील पुरंदरे मतदार संघावरुन जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनातच अध्यक्षपदाची निवडणूक सुरु असतानाच कुंजीर यांना जोरदार मारहाण केली आहे.

जगताप यांच्या विरोधात आपण कोठेही तक्रार करणार नसून, पक्षाला वाटल्यास त्यांनी जगताप यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आपण आपल्या वैय्यक्तिक पातळीवर हा प्रश्‍न मार्गी लावू असा इशारा कुंजीर यांनी दिला आहे.

मणिशंकर अय्यर पुन्हा बरळले!

कॉमनवेल्थ गेम्स अपयशी झाले तर आपल्याला आनंदच होईल असे धक्कादायक मत केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या मतावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

दिल्लीत सुरु असलेल्या पावसाने आपण आनंदी असून, जर कॉमनवेल्थ गेम्स यशस्वी झाले तर आपल्याला याचा फारसा आनंद होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कॉमनवेल्थ गेम्सपेक्षा देशातील शेतीसाठी पाऊस महत्त्वाचा असल्याने आपण असे मत व्यक्त केल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे.

Monday, July 26, 2010

जगण्याची मैफिल अर्ध्यावर सोडून ‘सर’ गेले

सहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, मी आणि माझ्यासारखेच काही पत्रकार मंडळी श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी बंगलुरुत गेलो होतो. मी, अभिनय, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कॉर्डिनेटर अनुप, लोकमतचे सुधीर कुलकर्णी असा आमचा छान ग्रुप जमला होता. जगण्याची कला आम्ही शिकण्यासाठी जात होतो. हे दिवस आजही आठवतात. 15 दिवसांचा सहवास होता तो. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे होते. या प्रवासात. सुधीर भाऊ शिकवत होते,आनंदी कसे राहावे, अनुपकडे पाहिल्यावर वाटायचे किती छान हसरा मुलगा आहे हा. आणि तिसरी व्यक्ती होती अभिनय. चालता बोलता ज्ञानकोश म्हटलं तर यात वावगं काही नाही.


अभिनयला कशात रस नव्हता, कदाचित असा विषयच नसेल. वाचनापासून ते साहित्य, कला, संस्कृती, संगीत, नाटक, चित्रपट, लेखन, ब्लॉग, खवय्येगिरी, या सगळ्या जगण्याच्या कलेवर त्याचे मनापासून प्रेम होतेच, शिवाय तो एक उत्तम समीक्षकही होता.इंदूरमध्ये आम्ही एकदा भिमराव पांचाळे यांच्या मराठी गझलमैफिलीला गेलो होतो. या मैफिलीत अभिनयने मनमुराद दाद दिली होती, की पांचाळेंनाही ही दाद आपलीसी वाटली होती. अभिनयशी चर्चा करताना नेहमीच विविध विषयांची माहिती मिळायची. मराठीतील काना, उकार, वेलांटी मी त्याच्याकडूनच शिकलोय. ऑफिसमध्ये तो माझा सर असायचा, पण ऑफिस संपलं की मग चांगला मित्र. आज गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा त्याची आठवण मनाला सतावत आहे. तो अजूनही आपल्यातच आहे, असे माझे मन मला सांगत आहे.

काही जणांना एखाद्या विषयावर चर्चा करण्याची सवय असते. अभिनयचंही तसेच असायचे. पण त्याच्याशी चर्चा करताना आपल्याला त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळतेय याचे मनोमन समाधान असायचे.तो केवळ चर्चाच करायचा असे नाही तर, या चर्चेच्या माध्यमातून बरेच काही शिकवायचाही.अभिनयशी झालेल्या चर्चेच्या माध्यमातून एखाद्या विषयावरचा त्याचा सखोल अभ्यास त्यातून जाणवायचा.

अभिनयला वेब दुनियात येऊन साधारण दीड वर्षे झाली असतील. त्यानंतर मी आलो. सुरुवातीपासूनच आम्ही मराठी साईटमध्ये करावयाच्या बदलांचे प्लॅनिंग करायचो. नेहमीच नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न. अभिनय वाचकांच्या मनात डोकवायचा. काही लिहिले किंवा त्याला दाखवले की, तो वाचकांना हे पटणार नाही, असे ठासून सांगायचा. त्याच्या सांगण्यात एक वाचक दडलेला असायचा.

प्रत्येकालाच काहीतरी देण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.वेब दुनियात असताना प्रत्येक भाषेच्या व्यक्तीसोबत तो नेहमीच विविध विषयांवर चर्चा करायचा. ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, या राज्यातील लेखक कसे आहेत? त्यांची लेखनशैली कशी आहे? मराठी इतकेच त्यांचे साहित्य समृद्ध आहे का? तुमच्या राज्यात काय पाहण्यासारखे आहे? खाण्याचे पदार्थ, या आणि अशा विविध विषयांवर त्याची चर्चा चालायची. या माध्यमातून त्याला या राज्यांचा इतिहासही बर्‍यापैकी माहीत झाला होता.

अभिनयमध्ये जसा एक शिक्षक दडलेला असायचा तसाच त्याच्या शिक्षकाच्या पाठोपाठ त्याच्या विद्यार्थीपणाची सावली त्याच्या पाठीशी असायची. आमचा एक सहकारी विकास. त्याला टेक्निकल ज्ञान चांगले आहे. अभिनय जरी आमचा सर असला तरी, विकास किंवा इतर कोणी एखाद्या विषयाची माहिती देत असेल तर अभिनय आवर्जून ते ऐकायचा. त्याची माहिती आत्मसात करायचा.आपण या मुलांचे सर आहोत, आपण त्यांचे म्हणणे का ऐकायचे? असे त्याला कधीच वाटत नसे. चूक असणार्‍यांच्या विरोधात तो ठाम असायचा, तर बरोबर असणार्‍यांची साथही तो तितक्याच ताकदीने द्यायचा.

आज गुरुपौर्णिमा असल्याने अभिनयची जाणीव प्रकर्षाने जाणवत आहे. आज हा लेख लिहितानाही अभिनयची कमी मला जाणवत आहे. माझा प्रत्येक लेख तो वाचत, त्यातील चुका सांगत, बदल करत, आज मी लेख लिहीत आहे, पण यातील मात्रा, वेलांटी, उकार तपासणारा माझे सर आमच्यात नाही, ही खंत आयुष्‍यभर मनाला खात राहील.