Wednesday, December 20, 2017

खेड्यांकडे परत चला.....!

नुकतीच गुजरात अाणि हिमाचल प्रदेशची निवडणूक पार पडली. दाेन राज्यांची निवडणूक असतानाही साऱ्या देशाचे... देशाचे म्हणण्याएेवजी जगातील काही देशांचे गुजरातच्या निकालांकडे लक्ष लागले हाेते. व्यापार निमित्ताने बहुतांशी गुजराती जगातील विविध देशांमध्ये स्थायिक झालेत. त्यांचे गुजरातकडे लक्ष लागणे सहाजिकच अाहे. ३३ जिल्ह्यांच्या गुजरातमध्ये अहमदाबाद, कच्छ, भरूच, अाणंद, भावनगर, गांधीनगर, महेसाणा अशी काही शहरं अापल्या सतत एेकिवात अाहेत.  

फार क्वचित प्रसंगी गुजरातच्या ग्रामीण भागाविषयीचा उल्लेख इतर राज्यांमध्ये अापण एेकला असेल
. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातील महत्वाच्या राज्यांतील ग्रामीण भागाची चर्चा सातत्याने हाेत असते. या राज्यांतील बहुतांशी जनता ही खेड्यांमध्येच वास्तव्यास असल्याने तसेच कृषी अाधारीत अर्थव्यवस्था असल्याने या राज्यातील छाेट्या-छाेट्या गावांचाही उल्लेख राष्ट्रस्तरावर चर्चिला जाताे. अर्थात अाता परिस्थिती बदलली अाहे. अाता या राज्यातील खेडेही अाेस पडत अाहेत. काहींनी तर कात टाकली असल्याने खेडे अाणि शहर या मधला टप्पा या गावांनी गाठला अाहे. असाे. विषय गुजरातचा. तर यंदाच्या गुजरातच्या निवडणुकांमध्ये किंगमेकर काेण असा प्रश्न केला असता अनेक जण पंतप्रधान माेदी, काही जण काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तर बहुतांश जण हार्दिक पटेल, अल्पेश ठाकाेर, जिग्नेश मेवाणी या त्रिकुटाचे नाव घेतील. पण गुजरातमध्ये निवडणुकांमध्ये खरा किंगमेकर ठरली अाहे ती गुजरातची ग्रामीण भागातील जनता.  


जनतेने या साऱ्यांना अशा काही पद्धतीने नाचवलेय की न भूताे न भविष्यती अशीच ही निवडणूक ठरली
. सकाळपासून असेकाही बदल हाेत गेले की दिवस सरेपर्यंत नेमकं काेण जिंकलंय याचा अंदाजाच विश्लेषकांना येत नव्हता. अापण बाेलायचाे काही अाणि क्षणात अाकडे बदलतील की काय अशी धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत हाेती. पण सायंकाळनंतर जस जसे चित्र स्पष्ट हाेण्यास सुरुवात झाली तस तसे मतदारांनी शिकवलेला धडा राजकारण्यांना धडकी भरवत गेला. गुजरातमध्ये २०१२, २०१४ नंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार अाले. मात्र, यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपतील ज्येष्ठ नेत्यांना चांगलाच घाम गाळायला लावला. मुळात मागील तीन टर्म गुजरामध्ये भाजपचेच सरकार असल्याने याही वेळी अापणच येऊ असा अहंकार भाजप नेत्यांना नडला. तर बंडखाेर अशी अाेळख निर्माण केलेल्या त्रिकुटाला साेबत घेतल्याने अापला विजय निश्चित असल्याचे काॅंग्रेसला वाटत हाेते. यातच काॅंग्रेसच्या नेत्यांचे बेताल वक्तव्य भाजपला अाधार देऊन गेले. या साऱ्या घडामाेडीत एक मात्र स्पष्टपणे जाणवते ते ग्रामीण जनता सरकारवर नाराज अाहे. निकालांच्या अाकडेवारीकडे नजर टाकली असता हे स्पष्ट हाेते. शहरी भागातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास टाकला अाहे तर ग्रामीण भागातील जनतेने मात्र, सरकार विराेधात काैल दिला अाहे. नाेटबंदी, जीएसटी, पाटीदार अारक्षण, अाेबीसींचे प्रश्न या साऱ्यांचा या निकालावर चांगलाच परिणाम दिसून अाला. अातापर्यंत हिंदुत्त्व व भावनिक अावाहनाला प्रतिसाद म्हणून गुजरात मधील ग्रामीण जनतेने भाजपवर विश्वास दर्शवला हाेता. मात्र, अाता चित्र पालटले अाहे. ग्रामीण भागातील समस्या कायम असल्याने नाराज जनतेने जातेच उलटे फिरवले अाहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे परत फिराचा मंत्र दिला हाेता. माेदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनीही खेड्यातील जनतेच्या समस्या साेडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करत खेड्यांकडे परत चलाचा नारा दिला हाेता. मात्र, प्रत्यक्षात काही उतरले नाही.

खेड्याकडे हाेणारे दुर्लक्ष माेदींना गुजरातमध्ये चांगलेच महागात पडले अाहे
. अाता कर्नाटक वगळता एकही राज्याची तुर्तास तरी निवडणूक नाही. त्यामुळे माेदींकडे भरपूर कालावधी असून, या काळात ग्रामीण जनतेच्या हितासंदर्भात त्यांनी जर चांगले निर्णय घेतले तरच अागामी काळात पुन्हा एकदा भाजप दिसेल अन्यथा राहुल गांधी तर तयारच अाहेतच......

Sunday, July 2, 2017

भविष्यासाठी तरी जगतील का झाडं

राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात ४ काेटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात अालाय. यासाठी राज्यातील ८८०७ शाळांमध्ये इकाे-क्लबही तयार केले जाणार अाहेत.वनमंत्र्यांनी यासाठी माेठे अनुदानही मंजूर केले अाहे. यापूर्वीही राज्य शासनाने अशाच प्रकारे उपक्रम राबवत १२ तासांमध्ये १५३ वृक्षांच्या प्रजाती लावत सहा लाख वृक्षप्रेमींच्या सहाय्याने दाेन काेटी ८० लाख वृक्ष लावत लिम्का बुकमध्ये नाव नाेंदवण्याचा विक्रमही केला. अाज यापैकी किती झाडं प्रत्यक्षात जिवंत अाहेत हा स्वतंत्र संशाेधनाचा विषय अाहे.  

एकीकडे देशातील,राज्यातील वनक्षेत्र झपाट्याने कमी हाेताना तसेच झाडांची बेसुमार कत्तल हाेत असताना शासनाने ‘झाडे वाचवा, झाडे जगवा’ साठी घेतलेला पुढाकार काैतुकास्पद अाहे. राज्यात अाज घडीला ६१९१६ चाैरस किलाेमीटरवर वनक्षेत्र अाहे. राज्याचा विचार केला तर ते एकून राज्याच्या २१ टक्क्यांच्या जवळपास अाहे. यात पानगळीची शुष्क वेन, दमट वने, काटेरी, सदारहित,पर्वतीय तसेच दलदलीय वनांचा समावेश अाहे. निसर्गाची भरभरून देणगी लाभलेल्या विदर्भातील नागपूर विभागात सर्वाधिक तर एेतिहासिक वारसा म्हणून नावाजलेल्या अाैरंगाबाद विभागात सर्वात कमी वनक्षेत्र अाहे. शासनाच्या वृक्ष संवर्धनाच्या विविध याेजनांना मागील काही वर्षात अडकाठी ठरली ती दुष्काळाची.  

पाऊसच नसल्याने या काळात वनक्षेत्रं तर कमी झालीच शिवाय झाडंच जगत नसल्याने अभयारण्य अाणि वनसंपदा झपाट्याने नष्ट झाली. याचा माेठा फटका अापल्याला सहन करावा लागला. मागील वर्षापासून पुन्हा एकदा पावसाने मनावर घेतल्याने दुष्काळाचा चाप्टर अाता क्लाेज झालाय. राज्य शासनालाही पावसाने साथ दिल्याने पुन्हा एकदा राज्य हरित करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीच्या याेजनांवर भर दिला असला तरी या साऱ्या याेजनांमध्ये अभाव दिसताेय ताे मात्र नियाेजनाचा. यापूर्वीही शासनाने वृक्ष लागवडीचा प्रकल्प हाती घेतला हाेता. त्यातही कष्ट, पैसा अमाप पद्धतीने खर्च करण्यात अाला. शाळा, महाविद्यालयांपासून ते सरकारी कार्यालये, मंत्री, लाेकप्रतिनिधी, राजकीय नेते इतकेच काय तर सामान्य जनतेमध्ये ज्यांच्याविषयी अाैत्सुक्य असते अशा सेलिब्रीटींनीही यात याेगदान करत अापल्या नावे झाडं लावली. त्यांच्या कारकीर्दी प्रमाणेच या झाडांचे अायुष्य मर्यादीत राहिले.  

इतर शासकीय याेजनांप्रमाणेच याही याेजनांचे भविष्य झाडे माेठी हाेण्यापूर्वीच दिसत अाहे. अनेक शासकीय याेजना सुरू हाेतात, त्यांचा मध्य अाणि शेवट मात्र एखाद्या ब्रेकींग न्यूजच्या माध्यमातूनच अापल्याला वाचायला किंवा पहायला मिळताे. हीच तर खरी गाेम अाहे. सरकार याेजना अनंत अाणते मात्र, त्याची अंमलबजावणी हाेता हाेता ती याेजनाच कालबाह्य हाेऊन जाते. या तुलनेत इतर देशांचा विचार केला तर याेजना सुरू करण्यात अाणि त्याची तंताेतंत अंमलबजावणी करण्यात हे देश किती तरी पटीने अाघाडीवर अाहेत. अाॅस्ट्रेलिया, न्ययूझीलंड इतकंच काय तर चीनचेही जिवंत उदाहरण घेण्यासारखे अाहे. चीनमध्ये प्रदूषणात माेठ्या प्रमाणावर वाढ हाेत अाहे.  

दुसरीकडे यावर मात करण्यासाठी जिद्दी चीन सरकारने निसर्गालाही नमवायची तयारी सुरू केली अाहे. चीनच्या ग्वांक्सी प्रांतात जगातील पहिली फाॅरेस्ट सिटी तयार केली जात अाहे. अाेसाड जागेत कशा पद्धतीने प्रत्यक्षात स्वर्ग अवतरू शकताे असेच हे चित्र असेल. २०२० पर्यंत हे शहर पूर्णपणे तयार असेल. या शहरात दहा लाख राेपे अाणि ४० हजारांवर झाडे नुसती लावलीच जात नाहीत तर त्यांची याेग्य निगाही राखली जातेय. ४३२ एकरमध्ये हे शहर तयार हाेत असून, ली नदीच्या काठावर तयार हाेणाऱ्या या शहरातील प्रदुषण टाळण्यासाठी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना बंदी तर असेलच शिवाय रेल्वे देखील इलेक्ट्राॅनिकवर चालणारी असेल.  

या फाॅरेस्ट सिटीमध्ये किमान ९०० टन दरवर्षी अाॅक्सिजन तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शहरातील माेकळ्या जागे साेबतच बांधण्यात येणाऱ्या इमारतींवरही छाेटी-छाेटी झाडे कशी लावता येतील याचा प्रयत्न केला जाताेय.शहर पूर्ण झाल्यानंतर निसर्गाचे नियम पाळणारे ३० हजारांवर नागरिक यात घरे घेऊ शकणार अाहेत. अर्थात यासाठी सरकारी नियमही अत्यंत कडक असणार अाहेत. ज्या प्रमाणे चीन मधील नागरिक सरकारच्या धास्तीने म्हणा किंवा भविष्याच्या काळजीचे नियम पाळण्याचा काटेकाेरपणे प्रयत्न करतात त्याच प्रमाणे जर अापल्या देशातील जनतेनेही केले तरच खऱ्या अर्थाने अापण झाडे जगवण्यासाठी घेतलेली मेहनत सत्यात उतरेल अाणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्यही उज्ज्वल असेल यात शंका नाही.

Monday, June 5, 2017

शब्दांची अनाेखी दुनिया

अापण नेमक्या कुठल्या दुनियेत वावरत असताे यावर अापलं जगणं अवलंबून असतं. प्रत्येकाची दुनिया निराळीच असते. काही जणांची स्वप्नांची दुनिया असते, काही जणं वास्तवात जगतात, काही जणांची इच्छाच म्हणजे त्यांचं जगणं असतं. काही जणांना या पैकी एकाही दुनियेत जगायचं नसतं. अशा या दुनियादारीत शब्दांचीही एक छाेटीशी दुनिया अाहे. हे जग तसं पहायला गेलं तर खूपसं माेठं अन्् काही जणांसाठी खूपसं छाेटंही असतं. शब्द शब्दाला भिडले की वाद हाेतात. तेच शब्द त्वेषात अाले की इगाे जागा हाेताे अाणि तेच शब्द प्रेमाने बाहेर पडले की संवाद घडताे. शब्दांच्या या दुनियेतील प्रत्येक पात्र निराळेच असते. ताे एक प्रकारचा विश्वास असताे. म्हणूनच कदाचित अापण खूप पूर्वीपासून म्हणत अालाेय.. ‘मी शब्द दिलाय...’ राजे असाे किंवा रंक सारेच जण शब्दांच्या या दुनियेत मनसाेक्त डुंबत असतात.

शब्द म्हणजेच वचन अन‌् शब्द म्हणजेच विश्वास असताे. या विश्वासाला तडा गेेला की ताे हाेताे विश्वासघात. सध्या पुन्हा एकदा हा शब्द शेतकरी अांदाेलनच्या माध्यमातून चर्चेला अालाय. सरकारने विश्वासघात केला, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशा प्रकारे साेशल मीडियावर सध्या जाेरदार शब्दयुद्ध पेटले अाहे. 

मराठी व्याकरणात मला मुळीच पडायचे नाही. पण या शब्दाची व्याख्या व्याकरणात खूप छान केली अाहे. ज्या वस्तूचा अर्थबाेध हाेताे असा वाक्यार्थ म्हणजे शब्द.  माणूस इतका प्रकारमय  झालाय की व्याकरण करणाऱ्यांनी (इथं मला व्याकरणाची उत्पत्ती, निर्माणकर्ते असे म्हणायचे अाहे) शब्दालाही प्रकारात विभागलेय. शब्दांचे प्रकार : सिद्ध,साधित, सिद्ध शब्दांचे तीन प्रकार देशी,तत्सम,तद्भव,परभाषी साधित उपसर्गघटीत,प्रत्ययघटीत-कृत(क्रुद्धात)/धातुसाधित आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक,संधी,अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त,पुनरूक्त शब्द,द्विरूकत,अंशाभ्यस्त,ध्वन्य अनुकरणवाचक शब्द. उपसर्ग व प्रत्ययांचे प्रकार इ. यात अापल्याला फारसे पडायचे नाही अन‌् मुळ विषयाला बगलही द्यायची नाही. वर उल्लेख केल्यामुळे शेतकरी अांदाेलनात सध्या हा शब्दच खूप धुमाकूळ घालताेय. शेतकरी अांदाेलनाचे मुळ शाेधण्यासाठी त्याचा खाेलात जात अभ्यास केल्यास मला शब्दाची खरी ताकद कळाली.

सध्या सुरू असलेल्या शेतकरी अांदाेलनाची खरी उत्पत्ती कशात झाली असा अापण प्रश्न केला तर अनेकांना सरकारची नामुष्की, सरकारची धाेरणं, अर्थकारण वगैरेचा बाेध हाेताे. मात्र, मला याचा विचार केल्यावर या ‘शब्दा’ने प्रचंड छळले. शेतकरी अांदाेलनाला जर खरं कुणी कारणीभूत असेल तर ताे हा ‘शब्द’च अाहे असा माझा पक्का समज झालाय.

तुम्हाला वाटत असेल की शब्दाचा यात काय संबंध? पण जरा विचार करा... मी वर म्हटल्याप्रमाणे अाधीपासूनच ‘मी शब्द दिला..’ असे म्हटले जाते. असाच शब्द भाजपने सत्तेवर येताना शेतकऱ्यांना दिला हाेता. याचेच पालन न झाल्याने सध्या राज्यभर याचा वादंग सुरू अाहे.  हजाराे टन भाजीपाला क्षणात रस्त्यावर फेकला जाताेय. रस्त्यांना दुधाचा अभिषेक केला जाताेय. वर्षभर मेहनतीने पाेटच्या पाेरासारखं ज्याला जपलं जातं ताे शेतमाल काही सेकंदात कचरा हाेताे. किंबहुना त्याचा कचरा केला जाताे. अाहे की नाही या शब्दात ताकद.  अाधी राजे-रजवाडे, मांडलीक, बादशाह हेही असाच शब्द देत असत. पण त्याकाळी शब्दाचा वकुब किंवा रुतबा इतका नव्हता की अातासारखे संप किंवा बंद केले जात. राज्यातील पहिला शेतकरी संप १९३५ ला अलिबाग येथे झालेला. विशेष म्हणजे कुठल्या शब्दासाठी नाही तर कुळ पद्धत बंद करण्यासाठी हा संप झाला हाेता.

हा संप तब्बल ६ वर्ष चालला हाेता. अलिबागच्या चरी येथे याची ठिणगी पेटली अन‌् २५ गावातील शेतकरी यात सहभागी झाले हाेते. असाे. अशा प्रथा, परंपरांविराेधात देशात अनेक लढे झाले. ते यशस्वी झाले. त्यामुळेच देशाचेही चित्र बदलले.

तर सध्या ‘विश्वासघात’ या शब्दाने चांगलाच गदाराेळ घातलाय. या शब्दाने अनेक नवे व्हिलन राज्याला दिलेत. मग ते भाजप सरकार असाे, जयाजी सूर्यवंशी हे शेतकरी नेताे असाे किंवा मुख्यमंत्री असाे. सध्या संपकरी शेतकऱ्यांना हे व्हिलन वाटतात. शब्दाचे सैन्यच इतके माेठेय की त्यातील ‘विश्वासघात’ हा एक प्यादा झाला. त्या एका प्याद्याने कसा गहजब माजवलाय ते पहा. सरकारने या शब्दाची नीट खातीरदारी केली असती किंवा त्याला नीट जपले असते व म्हटले ते केले असते तर असे घडलेच नसते. म्हणूनच म्हणतात ना शब्द म्हणजे बाण... ताे जरा जपून वापरा...

Friday, May 26, 2017

‘देवेंद्र’ फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकाॅप्टरला गुरुवारी लातूर येथील निलंग्यात अपघात झाला. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सहा सहकारी यात बालंबाल बचावले. चार नागरिक हेलिकाॅप्टर पडल्याने किरकाेळ जखमी झाले. काळजाचा ठाेका चुकवणाऱ्या अाणि क्षणात घडलेल्या या अपघाताने यंत्रणांतील अनेक त्रुटी पुन्हा एकदा उजागर केल्यात. मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबाबत अशा प्रकारचे दुर्लक्ष केले जात असेल तर इतरांचे काय? मुळात यंत्रणांच्या त्रुटी अाणि त्यांच्या अव्यवस्थित कारभारालाच टार्गेट करत भाजप व शिवसेनेने निवडणूक लढवली हाेती.

मुख्यमंत्र्यांनी अनेकदा यंत्रणांमध्ये सुधारणा करत अधिकाऱ्यांना धारेवरही धरले अाहे. त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या जातील असेही त्यांनी अनेकदा सांगितले. मात्र मागील १५ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये चक्क दुसऱ्यांदा बिघाड हाेणे ही साधारण गाेष्ट नाही. मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने ‘देवेंद्र’ असल्याने तसेच त्यांच्या पाठीशी चांगल्या कामांचे संचित असल्याने वेळाेवेळी ते अपघातातून बचावत अाहेत.

काल झालेल्या अपघातानंतर उपस्थितांनी हेलिकाॅप्टरकडे वेगाने धाव घेत अाधी मुख्यमंत्र्यांना बाहेर काढले. निलंग्याचे अामदार व मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे या घटनेने इतके भावनिक झाले हाेते की त्यांच्या डाेळ्यात पाणीच अाले. यापूर्वी गडचिराेलीतील अत्यंत दुर्गम अशा भागात हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड झाल्याने मुख्यमंत्र्यांना चारचाकीने प्रवास करावा लागला हाेता. एखाद्या चित्रपटाला शाेभतील अशा या घटना एकापाठाेपाठ घडत अाहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर काेसळण्याची ही कदाचित पहिलीच घटना असेल. एेऱ्हवी ते खराब हाेतेच मात्र अशा पद्धतीने ते काेसळणे हा गंभीर प्रकार अाहे. स्वत: मुख्यमंत्री अत्यंत अभ्यासू अाणि मुरलेले राजकारणी अाहेत. त्यांना कदाचित या घटनांची मालिका सतावतही असेल. पहिल्यांदा नक्षल भागात मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर खराब झाल्यानंतर या प्रकरणाची चाैकशी झाली का? ती कुणी केली? निष्कर्ष काय? याकडे कुणाचेच कसे लक्ष गेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी अाज नाष्त्यात काय खाल्लं याचं तासंतास रिपाेर्टींग करणाऱ्या माध्यमांचंही याकडे दुर्लक्ष झालंय असंच दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. त्यांच्या सारख्या स्वच्छ प्रतिमेचा व अभ्यासू मुख्यमंत्री मिळाल्याने भाजपनेही विविध निवडणुकांमध्ये बाजी मारली अाहे. कुणाला खाऊ देणार नाही अन‌् खाणारही नाही अशी भूमिका केंद्रात नरेंद्र यांनी तर राज्यात देवेंद्र यांनीही घेतली अाहे. यामुळे अनेकांची ‘दुकानं’ बंद झालीत. असे असताना मागील १५ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर दुसऱ्यांदा खराब हाेणे हा नक्कीच याेगायाेग नाही. शंकेची पाल चुकचुकायला यात वाव अाहे. निलंग्यात वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे हेलिपॅड करणे, तीन तास अाधीच धुराळा उडू नये म्हणून पाणी मारणे, हेलिपॅडवर विजेचे खांब, लाेंबकाळणाऱ्या तारा... गणित कुठंतरी चुकतंय... साऱ्यांना सारंच खटंकतंय पण काय? हे कुणीच सांगत नाहीए. पण सुरक्षा यंत्रणांनी अाणि मुख्यमंत्र्यांनीही वेळीच सावध हाेण्याची गरज अाहे.