श्रीलंकेच्या वाटेवरती......
मागील काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होत आहे. इटलीच्या
पर्यटकांचे अपहरण, आमदाराचे अपहरण आणि जिल्हाधिकारी ....... यांचे अहपरण करुन
नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या देशांतर्गत सुरक्षिततेबाबतची लक्तरं
वेशीवर टांगली आहेत. ऑपरेशन ग्रिन हंट बंद करण्याची नक्षलवाद्यांची मागणी आहे. मुळात
या मोहिमेचा काडीमात्रही फायदा सरकारला झालेला नाही. वाढत्या नक्षली कारवायांकडे केंद्र
सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटना पाहिल्यानंतर आता जणू शिक्कामोर्तब झाले आहे.
या घटनांची वारंवार उजळली केली तर श्रीलंकेतील तमीळ ईलम अर्थात एलटीटीईची आठवण
आपल्याला होते. पुन्हा एकदा अशाच प्रकारची संहारक संघटना उदयास येत असून
नक्षलवाद्यांच्या स्वरुपात तिचा भारतात प्रसार होत आहे. स्वतंत्र तमिळ
राष्ट्राच्या मुद्यावरुन एलटीटीईची स्थापना झाली होती. श्रीलंकेच्या
स्वातंत्र्यानंतर या संघटनेचा वापर काहीकाळासाठी राजकीय फायदा लाटण्याकामी करण्यात
आला. कालांतराने श्रीलंकन सरकारचे यावरील नियंत्रण सुटल्याने ही संघटना श्रीलंकन
सरकारसाठी डोकेदुखी ठरु लागली. आणि हीच परिस्थिती आज भारताची झाली आहे. नक्षलवादी
आपल्या ध्येय धोरणांपासून केव्हाच दूर गेले आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात दाद
मागण्याची त्यांची पद्धतही आता दहशतवादी बनत चालली आहे. नेतृत्त्वाचा अभाव आणि
भरकटलेले धोरण यामुळे नक्षलवादी चळवळ सरकारसाठी डोक्यावरून गेलेले पाणी बनली आहे.
चुकीची धोरणं, आदीवासींच्या समस्या सोडवण्यात सरकारला आलेले अपयश आणि वाढत्या
गरिबीमुळे देशातील कित्येक राज्यांच्या विकासावर नक्षवादी कारवायांमुळे परिणाम होत
आहे. एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरणच्या खातम्यापूर्वी श्रीलंकेत या संघटनेच्या
संघर्षात जवळपास 70 हजारावर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचीच पुनरावत्त्वी
भारतात होत आहे. दंतेवाडा येथे झालेल्या हल्ल्यानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती
टाळण्याचे सरकारने निश्चित केले होते. मात्र यानंतरही सातत्याने अशा प्रकारच्या
घटना घडत आहेत. किंबहुना यात वाढ होत आहे. नक्षलवाद्यांची ताकदही वाढत असल्याचे
यातून स्पष्ट झाले आहे.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी
असलेल्या पुण्यातही नक्षल समर्थकांच्या कारवाया आढळून आल्याने सरकारचे धाबे दणाणले
आहेत. भारतातील कट्टर साम्यवादी संघटनांनी सुरू केलेली ही चळवळ देशभर फोफावत असून,
देशभरातील 20 राज्यांतील 220 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रसार झाल्याची
धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर संस्थांना मिळाली आहे. जवळपास 50 हजारावर नक्षलवादी
या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून, त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही
दिले जात असल्याची नोंद गुप्तहेर खात्याकडे आहे. सरकारने याकडे गांभीर्याने
पहाण्याची गरज असून, आगामी काही दिवसांमध्ये नक्षली कारवायांवर नियंत्रण न आल्यास
श्रीलंकेची पुनरावृत्ती आपल्याला भारतात पहावयास मिळेल अशी भीती व्यक्त केली जात
आहे.