Wednesday, February 24, 2016

सुषमा ‘स्मृती’



लाेकसभेत बुधवारी पुन्हा एकदा दुर्गावतार पहावयास मिळाला. प्रचंड अावेश, कमालीचा संताप, अापली भूमिका मांडण्याची तत्परता अाणि याच्या जाेडीला तितकाच संयम हे सारं काही लाेकसभेत एकाच खासदाराच्या अंगी असणं तसं फारसं क्वचितच दिसतं.

क्रिकेट अाणि फुटबाॅलच्या मैदानावर एखादवेळी कमी गाेंधळ हाेत असेल तितका किंवा त्यापेक्षाही अधिक गाेंधळ अापल्याला लाेकसभेमध्ये नजरेस पडताे, एेकावयास मिळताे. फारसा इतिहासात मी जाणार नाही किंवा डाेकावण्याचा माझा मुळीच मानस नाही. परंतु, विराेधकांची ताेंडं अात्मविश्वासाच्या बळावर कशापद्धतीने बंद करता येतात. अापण काेणतीही चूक केलेली नाही हे छातीठाेकपणे कसं सांगता येतं, विराेधक सत्तेवर असताना त्यांनी कसं देशाचं खाेबरं केलं, ते किती दळभद्री सरकार हाेतं हे एका महिला खासदाराने  अशा काही पद्धतीने देशापुढे मांडलं की, कदाचित याचा अंंदाजा त्यांच्या भाषणापूर्वीच अाल्याने विराेधकांनी सभात्याग केला हाेता.  

काही वर्षांपूर्वी विराेधी बाकावर बसताना भाजप नेत्या सुषमा स्वराज या अशा पद्धतीने भाषण करत अाणि त्यांच्या विराेधकांची ताेंडंच गप्प करत. बुधवारी सुषमांच्या ‘स्मृती’ पुन्हा एकदा जाग्या झाल्या. ज्या अावेशात, शुद्ध अाणि श्रवणीय हिंदीत सुषमा स्वराज लाेकसभेत भाषण करत ताेच अावेश अाणि अापला विषय मांडण्याचे तेच कसब स्मृती इराणी यांच्या भाषणातून दिसून अाले. 

सकाळपासूनच लाेकसभा अाणि राज्यसभेत हैदराबादेतील राेहीत वेमालु अाणि जेएनयूतील दहशतवादी घाेषणाबाजीवर घमासान सुरू हाेते. गाेंधळ हा लाेकसभेच्या पाचवीलाच पुजलेला त्यामुळे ताे हाेणे अपेक्षितच हाेत. मात्र, बुधवारी लाेकसभेत या दाेन विषयांवर जे काही सदस्य बाेलले त्यात काही सदस्यांचे भाषण खरंच अभ्यासपूर्ण वाटले.  काॅंग्रेसचे ज्याेतिरादित्य सिंधीया यांनी काॅंग्रेसची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यांच्या भाषणात किंवा बाजू मांडण्यात काेणतीही धार दिसून अाली नाही. 

यानंतर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणाने अनेक काॅंग्रेस नेत्यांची बाेलती बंद झाल्याचे दिसले.  मध्येच राहुल गांधी उठून जाण्याची वेळ अाणि  ठाकूर यांनी अाराेपांच्या फैरी झाडण्यास सुरू केल्याची वेळ एकच अाल्याने काहीकाळ विराेधकांच्या खेम्यामध्ये शांतता हाेती. ठाकूर यांनी काही प्रश्न इतके ठासून विचारले की, लाेकसभेच्या कामकाज पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवण्यापुढे विराेधक त्यांच्या प्रश्नांना ताेंड देऊ शकले नाहीत. इथे ज्येष्ठ अाणि वरिष्ठ काॅंग्रेस नेत्यांचा हाेमवर्क कमी पडल्याचे दिसले. यानंतर  काहीकाळ शांततेत गेला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना कमी वेळ मिळाल्याने ते फारसे बाेलू शकले नाही, मात्र त्यांनी कमी वेळात प्रभावी भाषण केल्याचा केलेला प्रयत्न चांगला हाेता. 

यानंतर मात्र, मैदान गाजवले ते स्मृती इराणी यांनी. विराेधकांनी केलेल्या प्रत्येक अाराेपांना त्यांनी पुराव्यासह उत्तर दिले. त्यांचे भाषण इतके प्रभावी झाले की, विराेध करणे तर साेडाच अाता कदाचित विराेधकांना प्रश्न पडला असेल की त्यांना गुरुवारी पुन्हा संसदेत काय उत्तर द्यावे.  अाज बऱ्याच दिवसांनंतर लाेकसभेत गाेंधळासह पार पडलेली चर्चा मात्र ‘स्मृती’त राहणारी अाहे इतके मात्र निश्चित.
(इथे सुषमा यांच्या लाेकसभेतील उपस्थिती अाणि त्यांच्या भाषणांसाठी त्यांचा उल्लेख त्यांच्या स्मृती असा करण्यात अाला अाहे. मला विश्वास अाहे सुज्ञ वाचक तसाच अर्थ घेतील. )

Tuesday, February 23, 2016

काेण म्हणताे अायसीस भारतात नाही?


व्हाॅट‌्स अॅप मनाेरंजनाचं माेठं साधन झालं अाहे. म्हटलं तर याचा चांगला फायदाही करून घेता येताे. एखादी घटना घडली की तासाभरात त्याचा ऊहापाेह करणारी किंवा त्यावर मिश्किल भाष्य करणारी एखादी पाेस्ट यावर पडतेच. ज्यांना मनाेरंजन साेडून ज्ञानरंजन करायचे अाहे, अशांसाठीही अाजकाल व्हाॅट‌्स अॅप काेश महत्त्वाचे माध्यम बनत चालले अाहे. 

सकाळी असेच काही व्हाॅट‌्स अॅप पहाताना एक खूप चांगला विचार माझ्या माेबाईलमध्ये फिरत-फिरत अाला. ‘रामायणात दाेन व्यक्ती अशा हाेत्या, एक बिभीषण अाणि दुसरी कैकयी. बिभीषण रावणाच्या राज्यात राहूनही चांगला विचार करत अाणि कैकयी रामाच्या राज्यात राहूनही केवळ दुष्ट विचारांमध्येच रमत असे. दाेघांमध्येही शेवटपर्यंत बदल काही झाले नाहीत. म्हणजेच सारे काही विचारांवरच अवलंबून असते. सुधरणे अाणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असते. परिस्थितीवर नाही. ’ खरंच सुंदर पाेस्ट अाहे ही. 
 
विचारांवरून अाठवलं.. अशाच एका विचारांचं क्रूर वादळं संपूर्ण जगभरात गाेंधळ घालतयं. साेयीनुसार अापण त्याला अायसीस दहशतवादी संघटना असं नाव दिलंय. काही वर्षांपूर्वी अशाच एका क्रूर वादळाला अापण तालिबान या नावाने अाेळखायचाे. मध्यंतरी माध्यमांमध्ये खूप साऱ्या बातम्या येत. अाताही कधी-कधी एखादी सिंगल काॅलम पडलेली दिसतेच. भारतात अायसीस नाही. भारत अायसीसपासून सुरक्षित वगैरे..वगैरे.   

मी अायसीसचा उल्लेख विचारांचं वादळ असं केल्याने काहींना हे वाचताना अाश्चर्यकारक वाटेल. पण मुळात दहशतवाद हा काेणत्याही जाती-पातींशी बांधलेला नाही. ताे काेणत्याही धर्मातर्फे पुरस्कृत नाही. ती विचारधारा अाहे. क्रूर अाणि विक्षिप्त विचारधारा. महाभारत काळापासून ही विचारधारा जगावर वेळाेवेळी हावी हाेण्याचा प्रयत्न करते. काळानुरूप त्याला नवी अाेळख मिळते इतकेच. कधी ती तालिबान म्हणून अाेळखली जाते, कधी ज्यूंची निर्घुन हत्या करणाऱ्या हिटलरच्या रुपात ती वावरते तर कधी अायसीस म्हणून भल्या-भल्या देशांच्या मनात धडकी भरवते.
असाे. अशा संघटनांचा उदाेउदाे करणे अथवा त्या का उदयाला अाल्या, त्या कशा फाेफावत गेल्या हा माझ्या अाजच्या लेखाचा विषय नाही. तर हा दहशतवाद एक विचारधारा अाहे अाणि ताे प्रबळ बनत चालला अाहे असे मला वाटते. अापल्याकडे नेतेमंडळी दावे करतात, अायसीसचा भारतात प्रभाव नाही. 

दिल्लीतील निर्भयाचे प्रकरण, गाईचे मांस खाल्ले म्हणून कुटुंबावर हल्ला करून खातरजमा न करता एखाद्याचा बळी घेणं, एखाद्या तरुण मुलीची हत्या करून तिचे प्रेत उघड्यावर पडले असता सहा जणांनी तब्बल दाेन दिवस तिच्या प्रेतावर बलात्कार करणं, शेजारी जागा देत नाही म्हणून बारामती सारख्या गावात रस्त्यावर खेळणाऱ्या शेजाऱ्यांच्या मुलावर ट्रॅक्टर चढवत चिमुकल्याचा बळी घेणे इतकेच काय अारक्षणाची अवास्तव मागणी करत दाेन राज्य वेठीस धरत २० जणांचा बळी घेणं अाणि देशाचे ३४ हजार काेटी रुपयांचे नुकसान करणं  या साऱ्या घटना मला अायसीस विचारधारेच्याच वाटतात. मग अापण ठामपणे दावा कसा करू शकताे की, अायसीस भारतात नाही. अापला देश अाजही पवित्र अाहे. 

मुळात अापण एका विचारधारेचा विचार करतच नाही अाहाेत. अापण केवळ व्यक्ती केंद्रीत विचार करताेय. संस्था, संघटना केंद्रीत विचार करून काहीजण धर्माच्या चुलीवर राजकीय पाेळ्या भाजताहेत. मी वर दिलेल्या साऱ्या घटनांचा विचार करता अाणि अायसीसने कशा प्रकारे क्रूरपणे लाेकांच्या हत्या केल्या, लहान मुलांचे बळी घेतले, महिलांवर बलात्कार केले या साऱ्यांची तुलना केली तर मागील काही वर्षात अापल्या देशात झालेल्या काही घटना या अायसीस या दहशतवादी संघटनेने केलेल्या क्रूर घटनांपेक्षाही भयावह अाहेत. 
 
निर्भयाचे प्रकरण झाल्यानंतर देशभर अशा घटनांविराेधात, बलात्काऱ्यांविराेधात निषेध करण्यात अाला. परंतु यानंतरही अापल्या देशात अशा प्रकारच्या घटना थांबल्यात का? नाही. कारण अापण विचार मारत नाहीत. केवळ व्यक्तीला दाेष देत त्यांना मारण्याचे काम अापण करत अाहाेत.  हे कुठं थांबणार? कधी थांबणार? कसं थांबणार? याला केवळ एकच पर्याय अाहे. विचारांवर नियंत्रण, विचार बदलणे. विचार बदलला तरच अापली परिस्थिती बदलेल.

Sunday, February 21, 2016

पाकिस्तान नावाचा राक्षसांचा देश



माध्यमं लाेकशाहीचे चाैथे अाधारस्तंभ मानले जातात. एखाद्या देशात नेमके काय घडतेय, ताे देश कसा अाहे? तेथील माणसं कशी अाहेत, संस्कृती काय अाहे हे सारं काही जाणून घ्यायचे असले की अाधी त्या देशातील वृत्तपत्र तसेच इतर माध्यमांचा अभ्यास करावा असे बाेलले जाते. माध्यमं ही समाजाचा अारसा असतात. समाजात घडणाऱ्या विविध घटनांना अगदी तटस्थपणे मांडण्याचे काम माध्यमं अाणि या माध्यमातून पत्रकार करत असतात. एका छाेट्या घटनेने मात्र मला अत्यंत चिंतेत टाकले अाहे. मी स्वत: मागील एका दशकापासून  या माध्यमांचाच एक भाग म्हणून काम करताेय. परंतु, माझ्या मुलाने विचारलेल्या एका प्रश्नाने मला चांगलेच टेन्शनमध्ये अाणले अाहे. 
 
साेमवारची सकाळ असल्याने सवयीप्रमाणे मी सकाळी उठल्यावर अाधी बातम्या लावल्या. विविध चॅनल्स बदलल असताना प्रत्येक न्यूज चॅनल्सवर एखादी तरी पाकिस्तानशी संबंधित बातमी हाेतीच. पम्पाेरमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी हे कसे पाक पुरस्कृत अाहेत, मागील काही दिवसांपासून पाकच्या कारवाया कशा वाढत अाहेत अाणि यात नाहक अापल्या जवानांना कसे वीर मरण येतेय हीच टेप एका चॅनलवर लागलेली हाेती. 

माझा लहान मुलगा अशा बाबतीत अत्यंत संवेदनशील असल्याने अामच्या घरात माझ्या स्वातंत्र्यावर सध्या गदा अाली अाहे. (हे गमतीत) माझा कल हा अॅक्शनपट तसेच हाॅरर चित्रपट पहाण्याकडे अाहे.  परंतु, माझ्या मुलाचाही कल तसाच हाेत असल्याने मी मागील कैक महिन्यांपासून असे चित्रपट पहाणे बंद केले. त्याचमुळे मी अाता न्यूज चॅनल्स पहाण्याकडे कल वाढवला हाेता. माझ्या व्यवसायाशीही संबंध असल्याने माझे ते कामच अाहे. परंतु, अाता मला तेही बंद करावे लागणार असे दिसतेय. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे मी साेमवारी एक चॅनल पहात असताना माझ्या चार वर्षाच्या मुलाने मला प्रश्न केला. ‘बाबा हे पाकिस्तान काय अाहे, शाळेत पायऱ्या चढताना सारे माझे फ्रेंड पाकिस्तान- पाकिस्तान म्हणतात.’ मी स्तब्ध झालाे. त्याला काय उत्तर द्यावे हे मला सुचत नव्हते. पाकिस्तान अापला शत्रू देश अाहे असे त्याला सांगावे म्हटले तर अापण बालवयातच त्याच्या मनावर शत्रुत्त्वाचे संस्कार तर करत नाहीत ना असा प्रश्न मला पडला. मग काय सांगावे त्या राष्ट्राबद्दल? मी जर वेळीच मुलाच्या मनातील शंका दूर नाही केली तर ताे शाळेत इतर मुलांप्रमाणे पाकिस्तान-पाकिस्तान म्हणायला लागला तर? ताे माेठा हाेऊन राेहीत अाणि कन्हैय्याच्या पंक्तीत तर नाही ना जाणार हा गंभीर प्रश्नही कारण नसताना माझ्या मनाला स्पर्श करून गेला. 

दाेन मिनिटांची स्तब्धता झाल्यानंतर पुन्हा त्याने ताेच प्रश्न मला केला. मी अाधी न्यूज चॅनल बदलले. टीव्ही बंद केला 
अाणि त्याला सरळ उत्तर दिले. पाकिस्तान राक्षसांचा देश अाहे. हे उत्तर देताना माझ्यातला पत्रकार, माध्यमांचा जबाबदार प्रतिनिधी केंव्हाच दूर गेला हाेता. एक बाप अाणि एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या ताेंडून हे उत्तर बाहेर पडले.

परंतु, मी या उत्तराने स्वत:च संभ्रमात पडलाेय. काय सांगायचे पुढच्या पिढ्यांना काेण पाकिस्तान? हैद्राबाद येथे राेहीत वेमुलाने केलेली अात्महत्या, जेएनयूमध्ये सुरू असलेला कन्हैय्याचा देशविराेधी शाे. माध्यमं या साऱ्यांना देत असलेले एकांगी टच अाणि भडक कव्हरेज, विद्यापीठांतून राजराेसपणे दिले जाणारे ‘इंडिया गाे बॅक’चे नारे. (जेएनयूचे प्रकरण नेमके काय हे उपस्थितांना माहित. पण पुढच्या पिढ्यांवर मात्र त्याचा वाईट परिणाम हाेताेय हे मान्य करायला हवे.) 

या साऱ्यांनी मला पुरतं हालवून ठेवलंय. एकीकडे पाकिस्तानात भारतीय क्रिकेटरच्या विजयाच्या अानंदात भारतीय ध्वज घेणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला १० वर्षांची शिक्षा सुनावली जाते तर दुसरीकडे भारतात देशविराेधी घाेषणा दिल्यानंतर भारताचे भावी पंतप्रधान म्हणून ज्यांना हायलाईट केले जातेय ताेच माणूस सरकार तुमच्यावर कसे अन्याय करतेय हे त्यांना पटवून देत त्याची राजकीय पाेळी भाजण्याचा प्रयत्न करताेय. काश्मिरमध्ये पाकिस्तान अाणि अायसीसचे ध्वज उंचावले जाताहेत. देशविराेधी घाेषणा दिल्या जाताहेत. हे सारं मनाला व्यथित करणारं अाहे.
भारत अाणि पाकिस्तानची फाळणी झाल्यापासून या दाेन देशांमध्ये असलेले वैर जगाच्या काेणत्याही काेपऱ्यात अापण गेलाे तरी चर्चिले जाताना दिसून येते. किंवा येथील लाेकांना या दाेन देशांमध्ये असलेला ३६ चा अाकडा माहित असल्याची अापल्याला जाणीव हाेते.

पाक पुरस्कृत दहशतवाद्यांतर्फे भारतात केल्या जाणाऱ्या या सप्रमाण अाणि पुराव्यांसह अापण जगापुढे मांडल्या अाहेत.  परंतु, अाता अापल्या देशातच अशा प्रकारे पाक पुरस्कृत घाेषणा दिल्या जात असल्याने पुढच्या पिढ्यांच्या मनावर ते कुठंतरी घट्ट बिंबत चाललंय. हे कुठंतरी थांबायला हवं अन्यथा पुढच्या पिढ्यांमधूनच अधिक देशविराेधी कारवाया हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. माध्यमांनीही अशा प्रकारच्या घटनांना किती महत्त्व द्यावं याचं तारतम्य बाळगणं गरजेचे अाहे.