Monday, August 5, 2019

‘मनोहर’

मनोहरांनी आज जरा उशिरानेच डोळे उघडले होते. रोज सकाळी ५ वाजता उठून फिरायला जाणे हा त्यांचा शिरस्ता होता. त्यांनी घडाळ्याकडे पाहिले. ८ वाजले होते. अंगात जरा कणकण वाटत असल्याने ते तसेच पलंगावर कुस बदलत विचारात मग्न होते. आज आपण उठूच नये असे त्यांनी मनाशी ठरवले. पण नळाला पाणी आल्यावर उठावेच लागणार या विचाराने त्यांचा मुड गेला. आतापर्यंत त्यांचे उशीवर डोके होते आता त्यांनी डोक्यावर उशी घेतली

चादरीचा माग घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला खरा पण इतकावेळ त्यांच्या पायाशी निपचीत पडलेली चादर त्यांच्यापासून जणू दूर जाण्याच्या प्रयत्नात असल्याच्या थाटात अर्धी पलंगावर तर अर्धी खाली घसरली होती. दोन तीन वेळा मनोहर यांनी चादरीला जवळ करण्याचा प्रयत्न केला खरा पण ती काही त्यांच्या जवळ येण्यास तयारच नसल्यागत आणखीच खाली खाली सरकत होती. त्यात आता पलंगाला मच्छरदानी लावण्यासाठी जोडलेल्या  हुकाने तिला साथ देेण्यास सुरूवात केल्याने ती जागची हालायचे नावच घेत नव्हती

मनोहर चिडले; पण काहीच पर्याय नसल्याने त्यांनी रागावर नियंत्रण मिळवत लढाई आधीच तलवार म्यान केल्याच्या आर्विभावात मिचमिचत्या डोळ्यांनी उशी खालून डोके वर काढले आणि हलकेच हासत पुन्हा उशी खालच्या जादुई दुनियेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घडाळ्याचा काटा पुढे पुढे सरकत होता. अचानक मनोहरच्या लक्षात आले आज कुणीच घरात दिसत नाही? कुंदाची आई, कुंदा, मनोहरची आई? मनोहरांना हायसे वाटले. लग्न झाल्यापासून त्यांना असा एकांत कमीच मिळत असल्याने त्यांनी पुन्हा हा विचार नको असं मनाशीच ठरवलं

कुंदाची आई म्हणजे मनोहर यांच्या सौ. जोत्स्ना. एकदा लग्नाची गाठ जुळल्यानंतर ती सात जन्मापर्यंत कायम रहाते यावर मनोहर यांचा लग्नानंतरच विश्वास अधिक दृढ झाला होता. मनोहर ऑफिसला निघाल्यानंतरही सौ. त्यांना बाहेरच्या दारापर्यंत सोडायला जात. एकदा तर नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मनोहर मित्रांसोबत जेवायला बाहेर गेले होते. तिथे योगायोगाने सौ. देखील पोहचल्या होत्या. तेव्हापासून मनोहर मित्रांसोबत बाहेर जेवायला गेले नाहीत. आज याला २५ वर्ष तरी झाली असतील

सौ. नुसत्या भेटायला आल्या असत्या तरी एकवेळ चालले असते हो पण चक्क त्या मनोहर यांना डबा घेऊन आल्या. तोही थोडा थाडका नाही. चक्क चार ताळ्यांचा डबा. मेनू आजही आठवला तरी मनोहर मोठा आवंडा गिळतातआळूचं फदफदं, पिठल्याच्या वड्या, दहीभात, एका डब्यात गुदमरून पडलेले कांदा, लिंबू त्याखाली त्यांच्या ओझ्याने अगदीच पांगळे झालेल्या टमॅटोच्या फोडी. दोन तळलेल्या मिरच्या आणि खिर. त्या दिवसापासून मनोहर मित्र नावाच्या जमातीपासून वेगळे झाले ते आज तागायत. आपल्यातील फितूर कोण होता? कुणी सौं ना ते कोणत्या हॉटेलात जेवायला जाणार याची टिप दिली हे मनोहरसाठी न उलगलेले कोडे.

मागील २५ वर्षांपासून मनोहर केवळ यावरच विचार करताहेत. तो एकदा हाती लागला रे लागला की मग त्याला कोणती शिक्षा द्यायची यावर मनोहरने बसल्या बसल्या एक प्रबंधही खरडून काढला होता. सौं ना त्यांनी एकदाच खबऱ्याचे नाव विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आजतागायत मनोहरांच्या  मनात लाटण्याची धास्ती आहे. शेजारच्या शिर्के काकांनी तो युद्धाचा प्रसंग पाहिला होता. सौंच्या हातात लाटणं आणि मनोहरच्या हातात बचावासाठी लोखंडी तवा. त्या चिलखतामुळं मनोहर यांच्या डोक्यावर टेंगूळ वगळता कोणतीही इजा झाली नव्हती. तेंव्हापासून मनोहरांचा लोखंडी तव्यावर जीव जडलेला

हे सगळं आठवताना खूप वेळ गेला. पण कदाचित घडाळ्याची किल्ली संपल्याने ते ८ वरच थांबले होते. मनोहर यांनी जराशी खिडकी उघडली. बाहेर फांदीवर त्यांना एक कावळा दिसला. घराच्या खाली खूप गर्दी जमल्याचा भास त्यांना झाला

कुणी ओळखीचं दिसतंय का हे पहाण्यासाठी मनोहरनी खिडकीत नाक खूपसून थोडं डोकं बाहेर काढलं. दिनकर, रमेश, सूर्यकांत आणि ऑफिसातल्या सुनैनाही त्याला दिसल्याचा भास झाला. एवढी गर्दी का झाली असेल? पाणी भरायला? पण रमेश, दिनकर माझ्या घरापुढे येऊन पाणी का भरतील? मनोहरने पुन्हा डोळे चोळले. आपण स्वप्नात तर नाहीत ना या विचारात त्याने शर्ट शोधण्याचा प्रयत्न केला. पण रात्री त्यानेच कपडे धुण्यासाठी तो भिजवल्याचे त्याच्या लक्षात आले. तसाच तो हाफ पँट आणि बनेनवर बाहेर जायला निघाला. तर दार सताड उघडे. दारात समोर काही तरी अंथरलंय, त्यावर कुणीतरी झोपलंय, त्याच्या शेजारी उदबत्ती आणि धूप लावले आहे.

मनोहरची आई त्या झोपलेल्या माणसाच्या डोक्यावरून हाथ फिरवतेय. पदर डोळ्याला लावून ती सारखी रडतेय. कुंदा झोपलेल्या व्यक्तीच्या पायाशी सौंच्या मांडीवर बसला आहे. काहीच कळत नसल्याने ती तिथे जमलेल्या लोकांकडे बघतेय. सौ. जोत्स्ना तिला मांडीवरून खाली उतरवत त्या व्यक्तीच्या कानाजवळ गेली. काहीतरी पुटपुटली.. ती एवढंच म्हणाली. तो दिनकर होता. माझ्या खबऱ्या. चादर बाजूला केल्यावर दिसले, झोपलेली व्यक्ती होती मनोहरघडाळ्यात दुपारचे २ वाजले होते. फांदीवरचा कावळाही उडाला होता.

Friday, August 2, 2019

कन्फेशन कॉल

रात्रीचे दहा वाजले होते. आजही प्राजक्ताला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. दिवसभराचं काम करून माणूस किती थकून जातो या विचारातच तिनं गाडीला किक मारली आणि ती कधी ऑफिसवरून निघाली आणि कधी घर आलं हे तिलाच कळलं नाही. गाडीवर बसल्यानंतर तिचे फक्त डोळेच उघडे होते. मन मात्र कुठंतरी गुंतलं होतं. मनात सततचे विचार. कल्लोळ, गोंधळ, मनाचे अन् मेंदूचे द्वंद चाललेले. डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचा तीव्र प्रकाशही तिच्या मनात निर्माण झालेला अंध:कार दूर करू शकत नव्हता. तिला अभिव्यक्त व्हायचं होतं. मनमोकळं रडायचं होतं

ती थकली होती. तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं. मन भरकटून हेलकावे खात होतं. तिने आपार्टमेंटमध्ये गाडी लावली. साईड स्टँड लावत ती तशीच फ्लॅटकडे निघाली. गाडीची चावी आपण काढलीच नाही हे लिफ्टमध्ये चढताना तिच्या लक्षात आलं. पुन्हा तशीच हताश होत ती पार्किंगकडे वळली. हेड लाईटही सुरूच होता

तिने चावी लावत फ्लॅटचा दरवाजा उघडला. आत अंधार होता. तिच्या लक्षात नव्हतं आज सिद्धार्थ तिची मुलगी अन्वाला घेऊन तिच्या आईकडे गेलाय. सिद्धार्थ नाही म्हणजे आज स्वयंपाकाच्या उषा मावशीही आल्यापावली परतल्या असतील. बेडरूममध्ये जात तिने फोन गादीवर फेकून दिला. भूक तर लागली होती. पण मनातील द्वंदामुळे तिला घरी काही खायला मिळणार नाही हे लक्षातच नव्हतं. तिच्या डोळ्यात अचानक थेंब दाटले. रिकाम्या पोटात आग असेल तर मनावरची काजळी अधिक गडद होते. पापण्यांचे ओझे जड होते आणि मनावर शिडकावा करण्यासाठी नकळत थेंब ओघळू लागतात

ती फ्रिजकडे गेली. आदल्या दिवशीचे दोन ब्रेड तिला प्लास्टिकमध्ये पडलेले दिसले. तिने आतून पाण्याची बाटली काढली. ती ही अर्धीच भरलेली. सिद्धार्थची अक्कल काढत तिने फ्रिजचे दार जोरात आपटले व अर्धी भरलेली बाटली घेऊन ती पुन्हा बेडरूमकडे वळली

मोबाईलची बॅटरी आज संपलेली नव्हती हिच काय आज दिवसभरातील तिच्या समाधानाची बाब. तरी सवयीप्रमाणे तिने मोबाईल चार्जिंगला लावला. ती कधीच घरी आल्यावर शॉवर घेत नसे. पण का कुणास ठाऊक तिला आज शॉवर घेण्याची इच्छा होत होती. घामामुळे अंगाला चिकटलेले सारे कपडे तिने अंगा वेगळे केले. ती तशीच बाथरूमकडे वळली. जाताना तिने स्वत:चेच उघडे शरीर न्याहाळले. तिला जुने दिवस आठवले. तसे अचानक तिचे अंग शहारले. ती एकदम सावरली. तिने शॉवर सुरू केला. पाण्याचा मारा तिच्या शरीरावर झाला तसा तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यानंतर जशी वाफ अलगद स्वत:चं अस्तित्व सिद्ध करत आकाशाकडे झेपावते तसा अनुभव तिला आला. तिच्या ओल्या केसांतून पाणी निथळताना शरीर हलकं होत असल्याची जाणीव तिला होत होती. पुन्हा पुन्हा ती चेहऱ्यावर अन् पाठीवर शॉवर घेत होती. ती पाण्याशी आज इतकी समरस झाली होती की, पाण्यासारखं प्रवाहीपण आपल्यात कसं नाही हा विचार तिच्या मनात येत होता. आपणही पाणी असतो तरया विचारानं तिला पुन्हा डोळ्यातील गरम पाण्याची जाणीव झाली. ती तशीच मटकन् खाली बसली. आता पाणी तिच्या उघड्या शरीराचा वेध घेत फरशीवर साचत होतं. अन् ती दोन्ही हातांनी चेहरा झाकत रडत होती

तिला समजतंच नव्हतं आज असं काय झालंय? ती इतकी हताश का झालीय. सिद्धार्थशी आज बोलणंही झालं नाही. ऑफिसमध्येही बॉसची नेहमीची नाराजी वगळता इतर काहीच घडलेलं नाही. दिवस आला तसा गेला. उलट आज तर ऑफिसमध्ये ती  तासभर रोहित सोबत होती. रोहितचा विचार मनात आल्या आल्या तिला पुन्हा रडू कोसळलं

रोहित तिचा चांगला मित्र. वर्षभरापासून ते दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. दोघांचं मधे थोडं कशावरून तरी बिनसलं होतं इतकंच. पण पुन्हा दोघे एकत्र काम करत होते. विचार करता करताच तसाच ओल्या अंगावर तिने टॉवेल गुंडाळला. बेडवर पडली. रोहितचं नाव आठवल्यानंतर शॉवर घेताना तिला काय झालं होतंया विचारानं तिला इतकं ग्रासलं की ओल्या अंगानच आपण बेडवर निर्वस्त्र पडलोत याचंही तिला भान नव्हतं. रोहितचा विचार मनात आल्यावर तिने टॉवेलची गाठ थोडी सैल केली. तिला आपल्या या वागण्याचा धक्का बसला. तर्क वितर्क आणि अर्थांचं वादळ तिच्या मनात पुन्हा घोंगावायला लागलं. तिने दिर्घ श्वास घेतला. पुन्हा टॉवेल घट्ट गुंडाळला. लक्ष दुसरीकडं लागावं म्हणून तिने मोबाईल उचलला. नेट ऑन केल्या केल्या वाजलेल्या मॅसेज टोनने घरातील शांततेचा भंग झाला. कोणताही आवाज सहन होणार नाही अशी आपली आज अवस्था झाल्याचं तिच्या लक्षात आल्याने तिने फोन सायलंटवर केला. असंख्य मॅसेजेस, असंख्य व्हॉट्स एप, दोन मिनिटे केवळ मॅसेजेस पडत होती आणि तिचं ह्रदय त्याच वेगाने धडधडत होतं

सिद्धार्थचेही मॅसेज होते त्यात. ते पहाणं तिने टाळलं. त्याचा मिस कॉलही होता. रोहितविषयी आलेल्या विचारांमुळे सिद्धार्थला फोन करताना तिला अपराधीपणाचं वाटलं. तिने त्याच्या मिस कॉलला उत्तर दिले नाही. सिद्धार्थ आणि तिच्या लग्नाला आता १२ वर्ष झाली होती. दोघांचंही लव्ह मॅरेज होतं. गोरागोमटा, डॅशिंग सिद्धार्थ तिला कॉलेजच्या पहिल्याच भेटीत आवडला होता. नंतर दोघांनीही एका आयटी कंपनीत काही दिवस सोबत कामही केलं होतं. तेंव्हाच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. साऱ्या आठवणी बाजूला सारत पुन्हा ती मोबाईलमध्ये गुंग झाली. सिद्धार्थ नुकताच एका नव्या कंपनीत जॉईन झाला होता. त्याच्या जॉब प्रोफाईल विषयी दोघाचं फारसं बोलणंही झालं नव्हतं. दोघांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने ते फार क्वचित सोबत असत

मोबाईलमध्ये तिला असंख्य मॅसेजेस दिसत होते. यात तिला रोहितचाही मॅसेज दिसला. तिने तो पटकनं काढून वाचला. कुठलासा फॉरर्वडेड मॅसेज होता तो. तो पाहिला तसा तिने लगेचच डिलीटही केला.कोणताही रिप्लाय न देता. हा काय मॅसेजंय.. मनाशी बोलत नाक मुरडत तिने पुन्हा रोहितचा प्रोफाईल फोटो पाहिला. तशी ती सावध झाली. आपण काही चूक करतोय या अपराधी भावनेने तिने मोबाईल बॅक घेत टेक्ट मॅसेजेसकडे आपला मोर्चा वळवला. ती मॅसेजेच वाचू लागली. न रहावल्याने तिने अखेर सिद्धार्थचा एक मॅसेज वाचला
Welcome to Confession, a social art project by Jon jacobs. Simply call the number below and press 1 to confess, or 2 to hear someone’s confession. 
असा काहीसा तो इंग्रजीत मॅसेज होता. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. सिद्धार्थचा मॅसेज वाचल्याने ती जरा अस्वस्थ झाली होती. तिने पुन्हा मोबाईल गादीवर पटकला आणि छताकडे मंद फिरणाऱ्या पंख्याकडे पहात बसली. रात्रीचे १२ वाजले होते. पंखा मंद मंद फिरत होता पण तिच्या मनामध्ये मात्र विचारांनी वेग घेतला होता. सिद्धार्थ ऐवजी आपल्याला रोहितचा मॅसेज का वाचावा वाटलाशॉवर घेताना रोहितचा विचार आल्यानंतर शरीराला कुणीतरी स्पर्श करून गेल्या सारखे का वाटले? या विचारांनी तिचे डोके जड झाले होते
आपल्या डोक्यातही एखादी चिप असती आणि ती आपण काढू शकलो असतो तर असा विचार तिच्या मनात आला. रोहितशी बोलताना असाच एकदा विचार आपल्या मनात आला होता आणि दोघे कितीतरी वेळ हसत होतो हे तिला आठवले. हलकेसे स्मित करताना पुन्हा तिच्या गालावर खळी पडल्याचे तिला जाणवले. एकदा रोहितने तिच्या या खळीचे कसे कौतुक केले होते, तेंव्हा ती कशी लाजली होती हेही विचारांच्या ओघात तिला आठवले. पुन्हा आपलं डोकं गदा गदा हलवत तिने आपल्याला आज सारखा रोहितचाच का  विचार येतोय यावर नाराजी व्यक्त केली. पण तिचं मन आज काहीतरी वेगळा विचार करतंय असं तिला जाणवलं. आता ती नेमकं आपल्या मनात आहे तरी काय? हे शाधून काढायचे म्हणून ठरवून आरशा पुढ्यात बसली. घरी कुणीच नसल्याने तिने फक्त टॉवेल गुंडाळला. तशी ती आरशा पुढ्यात स्वत:शीच गप्पा करू लागली
गालावर मुद्दाम खळी आणत ती स्वत:च पुटपुटली रोहित तुला आवडतोय. हे मान्य कर. अपराधी  भावनेने तिने मान खाली घालत हे मान्यही केलं. मग स्वत:लाच प्रश्न विचारत ती म्हणाली. का? माझा सिद्धार्थ आहे की. तो तर मला खूप आवडतो. सिद्धार्थ आणि रोहित असा मनात सुरू असलेला द्वंद तिला उमगला होता. मग तिनं दोघांची तुलना सुरू केली. ती जितकं मनमोकळं रोहितशी बोलत होती तितकी ती सिद्धार्थशी बोलत नसे असे तिला जाणवले. ती पटकंन आरशा पुढ्यातून उठली. तिला आता विचारांनी गरगरायला लागलं. पुन्हा बेडवर पडून ती त्याच विचारात गढून गेली. तिला समजेना आपल्या मनातील द्वंद कसं दूर करावं? कुणाशी आपण हे बोलावं. अशी कोण व्यक्ती असेल की जी दोघांनाही ओळखत नसेल आणि तिच्याशी बोलल्यानंतर निदान आपले मन तरी हलके होईल.
 बाटलीतील पाणी तिने झटपट संपवलं. मोठा उसासा घेतला. ती तिच्या मित्र- मैत्रिणींची यादीच घेऊन बसली. मनातील नावं संपल्यानंतर तिने पुन्हा मोबाईल हातात घेतला. भरभर ती त्यातील काँटॅक्ट लिस्ट पाहू लागली. तिला यातील एकही नाव विश्वासाचं वाटत नव्हतं. पण का? ते तर तिचे चांगले मित्र-मैत्रीण होते. पण प्रसंग मोठा कठीण असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने मोठा उसासा घेत मोबाईल गादीवर ठेवण्याचा प्रयत्न केला तितक्यात तिला सिद्धार्थने पाठवलेला तो मॅसेज आठवला. मॅसेज बॉक्समध्ये जात तिने तो शोधून काढला. त्यातल्या ओळी वाचल्या. तिच्या लक्षात आलं.. तो नंबर विदेशातला होता. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित तरळलं. आपण या नंबरवर फोन करत जर  कन्फेस केलं तर? पण कशाचं कन्फेस? सिद्धर्थ ऐवजी रोहितचा विचार केला म्हणून का रोहित आवडायला लागलाय हे सांगण्यासाठी कॉल करायचा? बस आता मनाला अधिक तान न देता तिने कॉल जोडायचं ठरवलं. एकदा तिने पुन्हा रोहितचं व्हॉट्स ऍप स्टेटस चेक केलं नंतर सिद्धार्थ ऑनलाईन आहे का हे पहाण्यासाठी तिने त्याचेही व्हॉट्स ऍप स्टेटस पाहिलं. दोघंही ऑनलाईन नव्हते. खात्री पटल्यानंतर तिने उगीचच आकाशाकडे पहात देवाचं स्मरण केलं अन् कॉल जोडला. सुचनेप्रमाणे १ नंबर डायल केला
समोरून आवाज आला.. हॅलोआवाज तिला जरा ओळखीचा वाटला.. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलंतिच्या मनातील वादळ तिला शांत करायचं होतंबोलण्यापूर्वी तिने पुन्हा एकदा नंबर चेक केला. चुकून सिद्धार्थ किंवा रोहितला नंबर लागू नये एवढीच तिला खात्री करायची होती. नंबर चेक केल्यावर तिने न थांबता भडाभडा बोलायला सुरूवात केली
मी प्राजक्ता. मला काही कन्फेस करायचंय.. पुढून काहीच उत्तर आलं नाही. तिला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. मनात धडधड सुरू होती. पण तरीही मनाला आधार देत तिनं बोलणं सुरू केलंमाझं आणि सिद्धार्थचं लव्ह मॅरेज. आमच्या लग्नाला १२ वर्ष झालीत. आमच्यात कसलेही वाद किंवा मतभेद नाहीत. आम्हाला एक छान छोटी मुलगीही आहे. आमचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही नौकरी करतो. घरी कुणीच नसतं. मी ऑफिसवरून घरी आले की माझा नवरा कामावर गेलेला असतो. तो घरी परतला की सकाळी मी कामावर गेलेली असते. आमचं असं बोलणं किंंवा नवरा-बायको म्हणून फारसं एकत्र येणं होतच नाही. महिन्यातून एखाद्या वेळेसच आमचा तसासंबंध येतो. (तसा या शब्दावर तिने लाजत पण जरासा जोर दिला.)  मनाची आणि शरीराची भूक भागवणं होत नाही. कामाच्या व्यापात आणि भविष्याच्या तजवीजीतच आमचं मॅरेज लाईफ गेलं. आता मला माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा एक मित्र आवडायला लागलाय. त्याच्या विषयी माझ्या मनामध्ये तसले विचार येताहेत. ( आधी तसा या शब्दावर तिने जोर दिला होता. आता तसले वरही तिने जोर दिला.) 
मी काय करू? मला हेच कन्फेस करायचे होते. माझ्या मनात अपराधी भावना येतेय. मी दोघांना फसवतेय असं मला वाटतंयमला हे व्यक्त करायचं होतं. कुठंतरी अभिव्यक्त व्हायचं होतं म्हणून तुम्हाला फोन केला. माझ्या नवऱ्यानेच मला तुमच्या हा नंबर दिला होता. पण त्याला यातलं काही माहिती नाही. त्याने पाठवलेल्या मॅसेजतून केवळ मी हा नंबर घेतला आणि तुम्हाला कॉल केला. कुणाशी तरी बोलल्याने मला आता हलकं वाटतंय. हे सांगताना तिला रडू कोसळलं. मनावरचं दडपण दूर झालं की आपल्याला शरीरातील प्रत्येक नसं नसं साद घालतेय असा भास होतो. पुन्हा तरूण झाल्यासारखं वाटतं. डोळे घट्ट मिटल्यावर निसर्गाची पाना-फुलांची आरास दिसते. हिमशिखरांवर आपण एकटेच बागडतोय असं वाटतं. उन्हात गार वारा, अन् बोचऱ्या थंडीत कोवळ्या उन्हाचा आभास होतो. आपण तरंगतोय, नाही फुलपाखराप्रमाणे अलगद उडतोय असं वाटतंतिचं बोलणं सुरू असतानाच ती भानावर आली. आपण एकटेच बोलतोय, समोरचा व्यक्ती कोण? त्याला माझी भाषा समजतेय का? हा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेलाभानावर येत ती पुटपुटली.. मी फोन ठेवतेतसा समोरून आवाज आला. थांबा
मराठीतील आवाज ऐकूण पुन्हा ती दचकली. कोण? समोरून आवाज आला.. ते महत्वाचं नाही. तुमच्या शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे. पुन्हा आवाज ओळखीचा असल्याचा तिला भास झाला. तिने त्याकडे पुन्हा दुर्लक्ष्य केलं.. खुदकनं हासत ती म्हणाली.. बोला बोला…. काय म्हणता
समोरच्याचं संभाषण सुरू झालं…. तुमची अवस्था फारशी काही वेगळी नाही. माणसाला अभिव्यक्त करायला जागाच उरली नाही की माणसाचं मन हेलकावे खायला लागतं.. आपलं कुणीतरी असावंअसं वाटणं ही नैसर्गिक बाब आहे. असं प्रत्येकालाच वाटतं. शरीरापेक्षा मनाचं नातं खूप वेगळं असतं. मनाची तार जुळली की ती साखरेच्या पाकासारखी वाटते अन् तिच तार ताणली की झटक्याने कधीही तुटू शकते. तुमचं तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहेच. पण सहवासाने तुम्हाला रोहितही आवडतोय. त्याचं आवडणं मुळीच चुकीचं नाही. सिद्धार्थ कदाचित तुम्हाला वेळ देऊ शकत नसेलही; पण म्हणून त्याचं तुमच्यावरचं प्रेम कमी झालंय असंही नाही अन्  रोहित कदाचित तुमच्यातील मैत्रीवर प्रेम करत असेल. तुम्ही त्याचा तसा अर्थ काढला असेल. ( तसा या शब्दावर समोरच्याने जोर दिला.) पण म्हणून तुमच्या दोघांविषयीच्या भावनांमुळे तुम्ही अपराधी ठरत नाहीत. प्रेम हे असं नातं आहे की, जे व्यक्त अन् अभिव्यक्त नाही झालं की, मनात अपराधीपणाची भावना वाढते. रोहितकडे तुम्ही तुमची भावना व्यक्त करा. तो तुमचा चांगला मित्र आहे, असे तुम्ही म्हणता म्हणजे तो या तुमच्या भावनेचा चुकीचा अर्थ तर काढणारच नाही उलट तुमच्या दोघांमधील मैत्रीचं नातं हे अधीक घट्ट होईल
सिद्धार्थलाही तुम्ही तुमच्या भावना सांगा. त्याला तुमच्या दोन्ही गरजांची जाणीव करून द्या. त्याच्याशी अधिकाधीक बोलण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी मनमोकळं बोला. तुमच्या मनात साचलेल्या कचऱ्याला प्रवाही करा. मनात साचत गेलं की त्याचं डबकं होतं, संशय बळावत जातो, नात्यांची धार वाढते, नाती कमकुवत होतातअन् मन प्रवाही झालं की ते निर्मळ बनतं. प्रेमाची भावना ही अशीच आहे. ती मुळात निर्मळच आहे. आपण लोकं ती कलुषित करतो. त्यांना नको त्या नात्यांचं नाव देत जातो. भावना ही जपली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. नात्यांना बंधनं असावीतच पण ती घट्ट आवळली जावीत असं नको. मी आता फोन ठेवतोय. तुम्हाला आता एक एसएमएस मिळेल. तो निट वाचा. तो नो रिप्लायचा नंबर आहे. फक्त तो निट वाचा
शांतपणे एकूण घेणारी प्राजक्ता एकदम भानावर आली. पुन्हा आवाज, समजावणं ओळखीचं कसं? तिने पटकंन फोन ठेवला. फोन हिस्ट्रीमध्ये जात पुन्हा नंबर पाहिला. तितक्यात तिला सिद्धार्थचा मॅसेज दिसला. तो तिने आता झपाट्याने वाचण्यास सुरूवात केली. तिने आधीचा एसएमएस काढला. त्यात लिहिले होते, प्राजू, मी अन्वाला तुझ्या आईकडे सोडतोय, मला ऑफिसमध्ये जावं लागतंय. तुला खूप फोन केले पण तू कामात किंवा गाडीवर असशील. मॅसेज मिळाला की फोन कर. पोळ्याच्या मावशी नसल्याने तुझ्यासाठी खिचडी करून ठेवली आहे. ती खाऊन घे. माझ्या नव्या जॉब विषयी कल्पना द्यायची राहिली होती. मी एका कॉल सेंटरवर काम करतोय. थीम चांगली, वेगळी आणि चॅलेंजींग असल्याने मी हा जॉब स्विकारलाय. त्याचे थोडक्यात स्वरूप समजावे म्हणून खालचा मॅसेज वाच. बाकी आल्यावर बोलूच. खाली मॅसेज होता
Welcome to Confession, a social art project by Jon jacobs. Simply call the number below and press 1 to confess, or 2 to hear someone’s confession. Call number below.


Thursday, May 31, 2018

अापलं जमंत नाही अन‌् मी काही तुला साेडत नाही

पालघर निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच वर्मी लागला अाहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गडबडीने पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा ताेंडसुख घेतले. पालघरचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना भवनातून पत्रकार परिषदेचे अामंत्रण अाल्यानंतर लगाेलग साेशल मीडिया सक्रीय झाला हाेता.

काही चॅनलवाल्यांनी तर यावर कडी करत सेना भाजपसाेबत युती ताेडणार. उद्धव ठाकरे अशी घाेषणा करणार अशा स्ट्रीपही सुरू केल्या. अाेबी व्हॅन अॅक्टीव्ह झाल्या. राजकीय तज्ज्ञांकडे रिपाेर्टर्सनी धाव घेतली अन‌् अखेर पत्रकार परिषद सुरू झाली.
उद्धव यांच्या देहबाेलीवरून त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणवत हाेती. ते काेणत्याही क्षणी केंद्र व राज्यातून भाजपचे समर्थन काढून घेतली अशी साऱ्यांची अाशा हाेती. पण झाले नेहमीचेच. ते अाले… बाेलले… अाणि गेले…

पत्रकार परिषदेत उद्धव यांनी लाेकशाही बचावचा नारा देत थेट निवडणूक अायाेगालाच अाव्हान दिले अाहे. निवडणूक अायाेग किती भ्रष्ट कारभार करतेय हे सांगत त्यांनी पालघर मधील निवडणूक अधिकाऱ्यांच्याच निलंबनाची मागणी केली. पालघरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जनतेने कसे भाजपला नाकारले हे सांगताना त्यांनी शिवसेना व बहुजन विकास अाघाडीसह काॅंग्रेसला पडलेली मते एकत्र करत त्याची गाेळाबेरीजही मांडली.

निदान शेवटच्या क्षणी तरी उद्धव बाहेर पडण्याची घाेषणा करतील अशी अपेक्षा टीव्हीसमाेर बसलेल्या तमाम महाराष्ट्रीय जनतेला हाेती. मात्र, राजकारणात मुरलेल्या व शिवसेना माहित असलेल्या अनेकांनी पत्रकार परिषदेपूर्वीच चॅनलवाल्यांचे दावे खाेडत उद्धव ठाकरे अशी काेणतीही घाेषणा करणार नाहीत हे स्पष्ट केले हाेते. चंद्रकांत दादा पाटील यात अाघाडीवर हाेते. झाले तसेच पत्रकारांनी उद्धव यांचे निवेदन संपल्यानंतर सातत्याने त्यांना अाता बाहेर पडणार का असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली परंतु, भारतात लाेकशाहीची हत्या हाेतेय या मुद्द्यावर उद्धव ठाम हाेते. त्यांनी साेयीस्करपणे पत्रकारांच्या त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. एकंदर या अर्ध्या तासामध्ये पुन्हा एकदा एक गाेष्ट अधाेरेखित झाली अाहे, ती म्हणजे, अामचं काही जमंत नाही…अन‌् मी काही तुला साेडत नाही ही सेनेची भूमीका कायम असल्याचे.

भाजप सेना-युतीला ३४ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालाय. सेने भाजपमध्ये सर्वप्रथम १९८४ मध्ये युती झाली हाेती. लाेकसभेच्या निवडणुकीत मनाेहर जाेशी व वामनराव महाडिक भाजपच्या तिकीटावर लढले हाेते. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये काॅंग्रेसबद्दच्या सहानुभूतीमुळे या दाेन जागा साेडल्या तर देशभरात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला हाेता. यानंतर सातत्याने सेना-भाजपयुतीमध्ये चढ-उतार हाेत अालेत. १९८४ पासून ते अाज २०१८ पर्यंत अनेकदा सेना-भाजप युतीमध्ये फूट पडलेली अापल्याला दिसून येते.

अाता चित्र पालटले अाहे. दाेनही पक्षांनी एकमेकांचा अाधार घेत महाराष्ट्रात स्वत:चे स्थान निर्माण केले अाहे. भाजपनेही ग्रामीण भागात अापली ताकद वाढवत सेनेच्या ताब्यातील अनेक पालिका, ग्रामपंचायती, गा्वं, खेडी ताब्यात घेतली अाहेत.

शिवसेनेनेही भाजपला चिमटे काढणे काही साेडलेले नाही. वारंवार अाम्ही राजीनामे खिशातून ठेऊन फिरताे हे सांगायचे पण ते द्यायचे काही नाहीत या सेनेच्या अजब भूमिकेने सेनेतील निष्ठावानही कंटाळलेत. राज्यात जर युती तुटली किंवा सरकारमधून अापण बाहेर पडलाेत तर सेना फुटेल अशी भिती पक्षश्रेष्ठींना असल्याचे सेनेचे काही नेते व शिवसैनिक खाजगीत बाेलताना सांगतात. ही भितीच वारंवार खरी ठरतेय.

भाजप विराेधात जितके अाराेप मागील काही वर्षांपासून सेना करतेय तितके अाराेप विराेधकही करताना दिसत नाहीत. दाेघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण प्रत्यक्षात कधी अंमलात येतेय तेच पहाण्यात विराेधक व्यस्त अाहेत. असाे, उद्धव यांनी पुन्हा एकदा भाजपवर केवळ अागपाखड करत तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना हेच सिद्ध केलंय असं म्हणायला काही हरकत नाही….

Saturday, May 26, 2018

पालघरमध्ये इंटरटेंन्मेंट..इंटरटेंन्मेंट...इंटरटेंन्मेंट…


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका क्लिपमुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले अाहे. देशात साेशल मीडियाचा सुळसुळाट झाल्यानंतर अशा राजकीय क्लिप महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत. सध्या शंकेची ‘पाल’ चुकचुकण्याचे कारण वेगळेच अाहे. भाजप-सेनेला ‘घर’ (गड) राखायचा असल्याने राजकारणाने टाेक गाठले अाहे.

३२ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती अाहे. १९८४ साली पहिल्यांदा लाेकसभा निवडणुकांसाठी भाजप व शिवसेनेत युती झाली हाेती. भाजपच्या ‘कमळा’ वर मनाेहर जाेशी अाणि वामनराव महाडिक यांनी निवडणूक लढवली हाेती. यानंतरचा हा युतीचा प्रवास सुरू झाला हाेता. सातत्याने यात चढ-उतार येत गेले. स्व. प्रमाेद महाजन व स्व. गाेपीनाथ मुंडे यांनी युतीची धुरा खांद्यावर घेतली हाेती. त्यांच्या निधनानंतर मात्र युतीला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. नाेटबंदीनंतर या युतीला खऱ्या अर्थाने कधीही न संपणारे ग्रहण लागले अाणि मिठाचा माेठा खडा पडला. खडा कसला मिठाचे अागारच म्हणायला हवे.
८ नाेव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ वाजता नरेंद्र माेदी यांनी ५०० व हजाराच्या नाेटा बंद केल्या अाणि यानंतर झालेल्या शिवसेनेच्या प्रत्येक सभेमध्ये शिवसेनेने एकच सुर अाळवला. देशाचे अर्थकारण बिघडल्याचे उद्धव ठाकरे दाेन वर्षांपासून सांगत अाहेत. (नेमके कसले अाणि कुणाचे अर्थकारण गडबडले हा संशाेधनाचा विषय अाहे) सांगायचा भाग हाच की नरेंद्र माेदी यांचा हा ८ वाजताचा मुहूर्त युतीसाठी मात्र ‘गडबड’ ठरला अाहे.

राज्यात मागील एक वर्षात झालेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत, थेट सरपंच निवडणूक, विधान परिषद निवडणूक व लाेकसभेसाठीच्या पाेटनिवडणूकीत भाजपच्या विराेधकांच्या यादीत अाणखी एक नाव समाविष्ट झाले ते म्हणजे शिवसेनेचे. तसं सेनेनेही अापल्या विराेधकाची यादी अपडेट करत भाजपला यात सर्वाेच्च स्थानी बसवलेय. विराेधक कमकुवत असल्याने व त्यांना या ‘टाॅम अॅण्ड जेरी’ शाेचा फायदा उचलता न अाल्याने या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना व त्यांच्या सहकारी पक्षांचाच अधिक फायदा झाला हा भाग वेगळा.  

केंद्रातील माेदी सरकारला चारवर्ष पूर्ण झालेत. अवघ्या एका वर्षात पुन्हा लाेकसभा निवडणुका हाेत अाहेत. गुजरात पाठाेपाठ कर्नाटक निवडणुकांमध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर अाता महाराष्ट्रातही राजकीय वारे वेगाने वहायला सुरूवात झालीय. याचाच एक भाग म्हणून पालघरची लाेकसभा पाेटनिवडणूक चर्चेचा विषय ठरतेय.

सध्या या निवडणूक प्रचारात जनतेला ६४ कला अाणि १४ विद्यांची अनुभूती हाेतेय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काेणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच या इराद्याने भाजप, शिवसेना, बहुजन विकास अघाडी, काॅंग्रेस असे सारेच पक्ष बाह्या सावरून कामाला लागलेत.

याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाची एक क्लिप सार्वजनिक केली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीसाठी सत्तेचा वापर करत दबाव तंत्राचा अवलंब करत असल्याचा अाराेप सेनेने केला अाहे. दुसरीकडे या क्लिपमध्ये एडिटींग करण्यात अाले असून, ती अर्धवट क्लिप दाखवण्यात अाल्याचे सांगत सेनेचा दावा मुख्यमंत्र्यांनीच खाेडून काढला अाहे. मुख्यमंत्र्यांनी क्लिप अापलीच असल्याचे सांगितल्याने व उर्वरित भाग साऱ्यांच्या समाेर अाणल्याने शिवसेनेचे बुमरॅंग उलटले अाहे. काेण खाेटे, काेण खरे हे येणारा काळच ठरवेल परंतु, पालघरच्या सहा विधानसभा मतदारसंघासह उभ्या महाराष्ट‌्राचे मात्र यातून चांगलेच मनाेरंजन हाेतेय हे नक्की.  

पालघरची जखम
पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वानगा यांचे जानेवारीमध्ये ह्रदयविकराच्या धक्क्याने दिल्लीत निधन झाले. उत्तम जनसंपर्क, लाेकांच्या मदतीला धावणारा नेता, उत्कृष्ठ संघटक असणाऱ्या वानगा यांच्या निधनाने भाजपला चांगलाच धक्का बसला. वानगा हे एक दाेन नाही तर तब्बल तीनवेळा लाेकसभा तर २००९ मध्ये विधानसभेवर चांगल्या मताधिक्याने पालघरमधून निवडून अाले हाेते. त्यांनी या भागात भाजपला बळ दिले. वानगा यांच्या निधनानंतर त्यांचा माेठा मुलगा श्रीनिवास याला भाजपने लाेकसभेसाठी संधी द्यावी अशी वानगा कुटुंबीय व समर्थकांची इच्छा हाेती. मात्र भाजपच्या गाेटातून विष्णू सावरा व काॅंग्रेसतून भाजपत अायात झालेले राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. इथेच वानगा कुटुंबीय नाराज झाले अन‌्  शिवसेनेकडे अायतीच संधी चालून अाली. शिवसेनेने दिवंगत वानगा यांच्या पत्नी व दाेन मुलांना पक्षात प्रवेश देत श्रीनिवास यांना उमेदवारीही जाहीर केली. भाजपला सेनेकडून असे काही केले जाईल याची अपेक्षा हाेतीच. पण यावेळी सेना अधिक अाक्रमक असेल असे मुख्यमंत्र्यांना वाटले नाही. सेनेची मनधरणी करण्याचा भाजपने भरपूर प्रयत्नही केला पण यावेळी मुख्यमंत्र्यांना यात यश अाले नाही.

एकीकडे शिवसेना व भाजपमध्ये ‘युद्ध’ सुरू असतानाच दुसरीकडे काॅंग्रेस अाणि बहुजन विकास अाघाडीनेही अापापले उमेदवार जाहीर करत निवडणुकीतील चुरस अाणखी वाढवली अाहे. अादिवासी भागातील अापली ताकद पहाता सीपीएमनेही अापला उमेदवार इथे उभा केला अाहे.

तासा-तासाला पालघरवर भाजप व सेनेकडून काहीना काही क्रिया-प्रतिक्रीया घडत असल्याने उभ्या महाराष्ट‌्राचे लक्ष याकडे लागले अाहे. या साऱ्या राजकीय गाेळीबारात स्थानिक प्रश्नांचा साऱ्यांनाच विसर पडलेला दिसून येताेय. पालघरमध्ये सध्या बुलेट ट्रेनचा प्रश्न माेठा मानला जाताेय. पालघरच्या २५ जिल्ह्यांतून या बुलेट ट्रेनचा प्रवास हाेणार अाहे. केंद्र सरकारच्या विकासकामांमुळे स्थानिक मच्छिमारांचा तसेच शेतकऱ्यांचा सरकारवर राेष अाहे. वसईतील २९ गावं महापालिकेत येण्यास उत्सूक नसतानाही त्यांचा समावेश पालिका क्षेत्रात करण्यात अाल्याने गावकरी फडणवीस सरकारवर संतापले अाहेत. या विराेधात या भागात माेठे अांदाेलनही उभारण्यात अाले हाेते. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष्य करत या गावांचा पालिका हद्दीत समावेश केलाच. याचा माेठा फटका भाजपला पाेट निवडणुकीत बसू शकताे.

राजकीयदृष्ट्या विचार केला तर सहा विधानसभा मतदार संघांपैकी तीन जागा बहुजन विकास अाघाडीकडे, दाेन जागा भाजपकडे तर एक जागा शिवसेनेच्या ताब्यात अाहे. पालघर लाेकसभा मतदार संघाचा विचार करता अादिवासींसाेबतच उत्तर भारतीय तसेच गुजराती मतदारांना अाकर्षित करण्यासाठी भाजप सेनेकडून डावपेच अाखले जात अाहेत. पालघरमध्ये माेठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय असल्याने त्यांच्या मतांना अापल्याकडे वळवण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी अादित्य नाथ यांचीही सभा घेतली. स्मृती इराणींच्या माध्यमातून भाजपने गुजराती जनतेला अापलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक केवळ महाराष्ट्रापुरती उरली नाही तर अाता ती देशपातळीवर प्रतिष्ठेची झाली अाहे. मतदार नेमके कुणाला काैल देतात हे अाठवडाभरानंतर स्पष्ट हाेईलच परंतु, तुर्तास तरी निवडणूक प्रचारात तीन गाेष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात याचा शाेध कर्नाटकनंतर महाराष्ट्रातील मतदारांनाली लागला अाहे. त्या तीन गाेष्टी म्हणजे. १. इंटरटेंन्मेंट २  इंटरटेंन्मेंट अाणि ३. इंटरटेंन्मेंट. जे भाजप व शिवसेनेकडून मतदारांचे याेग्य पद्धतीने हाेतेय.

Wednesday, December 20, 2017

खेड्यांकडे परत चला.....!

नुकतीच गुजरात अाणि हिमाचल प्रदेशची निवडणूक पार पडली. दाेन राज्यांची निवडणूक असतानाही साऱ्या देशाचे... देशाचे म्हणण्याएेवजी जगातील काही देशांचे गुजरातच्या निकालांकडे लक्ष लागले हाेते. व्यापार निमित्ताने बहुतांशी गुजराती जगातील विविध देशांमध्ये स्थायिक झालेत. त्यांचे गुजरातकडे लक्ष लागणे सहाजिकच अाहे. ३३ जिल्ह्यांच्या गुजरातमध्ये अहमदाबाद, कच्छ, भरूच, अाणंद, भावनगर, गांधीनगर, महेसाणा अशी काही शहरं अापल्या सतत एेकिवात अाहेत.  

फार क्वचित प्रसंगी गुजरातच्या ग्रामीण भागाविषयीचा उल्लेख इतर राज्यांमध्ये अापण एेकला असेल
. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातील महत्वाच्या राज्यांतील ग्रामीण भागाची चर्चा सातत्याने हाेत असते. या राज्यांतील बहुतांशी जनता ही खेड्यांमध्येच वास्तव्यास असल्याने तसेच कृषी अाधारीत अर्थव्यवस्था असल्याने या राज्यातील छाेट्या-छाेट्या गावांचाही उल्लेख राष्ट्रस्तरावर चर्चिला जाताे. अर्थात अाता परिस्थिती बदलली अाहे. अाता या राज्यातील खेडेही अाेस पडत अाहेत. काहींनी तर कात टाकली असल्याने खेडे अाणि शहर या मधला टप्पा या गावांनी गाठला अाहे. असाे. विषय गुजरातचा. तर यंदाच्या गुजरातच्या निवडणुकांमध्ये किंगमेकर काेण असा प्रश्न केला असता अनेक जण पंतप्रधान माेदी, काही जण काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तर बहुतांश जण हार्दिक पटेल, अल्पेश ठाकाेर, जिग्नेश मेवाणी या त्रिकुटाचे नाव घेतील. पण गुजरातमध्ये निवडणुकांमध्ये खरा किंगमेकर ठरली अाहे ती गुजरातची ग्रामीण भागातील जनता.  


जनतेने या साऱ्यांना अशा काही पद्धतीने नाचवलेय की न भूताे न भविष्यती अशीच ही निवडणूक ठरली
. सकाळपासून असेकाही बदल हाेत गेले की दिवस सरेपर्यंत नेमकं काेण जिंकलंय याचा अंदाजाच विश्लेषकांना येत नव्हता. अापण बाेलायचाे काही अाणि क्षणात अाकडे बदलतील की काय अशी धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत हाेती. पण सायंकाळनंतर जस जसे चित्र स्पष्ट हाेण्यास सुरुवात झाली तस तसे मतदारांनी शिकवलेला धडा राजकारण्यांना धडकी भरवत गेला. गुजरातमध्ये २०१२, २०१४ नंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार अाले. मात्र, यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपतील ज्येष्ठ नेत्यांना चांगलाच घाम गाळायला लावला. मुळात मागील तीन टर्म गुजरामध्ये भाजपचेच सरकार असल्याने याही वेळी अापणच येऊ असा अहंकार भाजप नेत्यांना नडला. तर बंडखाेर अशी अाेळख निर्माण केलेल्या त्रिकुटाला साेबत घेतल्याने अापला विजय निश्चित असल्याचे काॅंग्रेसला वाटत हाेते. यातच काॅंग्रेसच्या नेत्यांचे बेताल वक्तव्य भाजपला अाधार देऊन गेले. या साऱ्या घडामाेडीत एक मात्र स्पष्टपणे जाणवते ते ग्रामीण जनता सरकारवर नाराज अाहे. निकालांच्या अाकडेवारीकडे नजर टाकली असता हे स्पष्ट हाेते. शहरी भागातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास टाकला अाहे तर ग्रामीण भागातील जनतेने मात्र, सरकार विराेधात काैल दिला अाहे. नाेटबंदी, जीएसटी, पाटीदार अारक्षण, अाेबीसींचे प्रश्न या साऱ्यांचा या निकालावर चांगलाच परिणाम दिसून अाला. अातापर्यंत हिंदुत्त्व व भावनिक अावाहनाला प्रतिसाद म्हणून गुजरात मधील ग्रामीण जनतेने भाजपवर विश्वास दर्शवला हाेता. मात्र, अाता चित्र पालटले अाहे. ग्रामीण भागातील समस्या कायम असल्याने नाराज जनतेने जातेच उलटे फिरवले अाहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे परत फिराचा मंत्र दिला हाेता. माेदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनीही खेड्यातील जनतेच्या समस्या साेडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करत खेड्यांकडे परत चलाचा नारा दिला हाेता. मात्र, प्रत्यक्षात काही उतरले नाही.

खेड्याकडे हाेणारे दुर्लक्ष माेदींना गुजरातमध्ये चांगलेच महागात पडले अाहे
. अाता कर्नाटक वगळता एकही राज्याची तुर्तास तरी निवडणूक नाही. त्यामुळे माेदींकडे भरपूर कालावधी असून, या काळात ग्रामीण जनतेच्या हितासंदर्भात त्यांनी जर चांगले निर्णय घेतले तरच अागामी काळात पुन्हा एकदा भाजप दिसेल अन्यथा राहुल गांधी तर तयारच अाहेतच......